मुंबई : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीस राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या यामुळे सुटण्यास मदत होईल.ठाणे महापालिका ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो बांधणार आहे. तिचा पहिला टप्पा २९ किलोमीटरचा असून त्याला ‘ठाणे अंतर्गत मेट्रो’ असे नाव देण्यात आले आहे. १० हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. जुने ठाणे स्थानक, नवे ठाणे स्थानक, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, राबोडी, साकेत आणि चेंदणी असा हा वर्तुळाकार मार्ग असेल. ठाणे रेल्वे स्थानकासह मुंबई व भिवंडी मेट्रोला ती जोडली जाईल.ठाणे शहर व परिसरातील वाहतुकीची वाढती गरज भागविण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यात आला आहे. त्यात जलद वाहतूक प्रणाली म्हणून ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रणालीची शिफारस करण्यात आली. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्पही मंजूर केला. या अहवालास राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. ठाणे शहरातील सर्व मेट्रो मार्गिकांच्या दरात एकवाक्यता राहावी म्हणून वर्तुळाकार मेट्रोचे दर हे मेट्रो ४ वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली या मार्गिकेनुसार राहणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो)मार्फत करण्यात येईल. तसेच, हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नवीन ठाणे ते ठाणे यादरम्यान २९ किलोमीटरचा असणार आहे. यामध्ये २० उन्नत, तर दोन भुयारी अशी २२ स्थानके असणार आहेत. सुमारे १३ हजार ९५ कोटींच्या या प्रकल्पामुळे २०२५ पर्यंत दररोज सुमारे ५ लाख तर २०४५ पर्यंत साधारण ८ लाख ७२ हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे.>ही आहेत प्रस्तावित स्थानकेनवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस डेपो, शिवाईनगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटर फ्रंट, पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन.
ठाण्याच्या १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:30 AM