कल्याण : पूर्वेतील चिंचपाडा रोड परिसरात राहणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या अधिराचा वाढदिवस. नोकरीनिमित्त पुण्यात राहणारे तिचे आईवडील पुण्यात अडकून पडले. तर अधिरा ही मामा जयेश सावंत यांच्या घरी राहते. तिचा वाढदिवस साजरा कसा करायचा या विचारात असतानाच सावंत यांनी भाचीचा वाढदिवस असल्याचा ट्विट पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलीस आयुक्तांना करताच कोळसेवाडी पोलीस केक घेऊन अधिराच्या घरी पोहोचले. आईवडील नसल्याने हिरमुसलेली अधिरा पोलीस काकांनी आणलेला केक पाहून भारावून गेली.जय अंबे सोसायटीमध्ये जयेश सावंत राहतात. मुंबईतील एका खाजगी कंपनीत ते काम करत असून त्यांच्या कुटुंबासोबत त्यांची भाची अधिरा राहत आहे. मामा जयेश यांनी अधिराचा वाढदिवस असल्याचे ट्विट डीजी आणि ठाणे पोलीस आयुक्तांना केले. त्याची दखल घेऊ न पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कोळसेवाडी पोलिसांना अधिराच्या घरी केक नेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे यांनी कर्मचाऱ्यांसोबत केक घेऊन सोसायटी गाठली. अधिराला केक देऊन तिला शुभेच्छाही दिल्या.>अधिराचे आईवडील नोकरीनिमित्त पुण्याला असून तिच्या वाढदिवसाला येणे त्यांना शक्य झाले नाही. पोलिसांनी तिच्या वाढदिवसासाठी केक आणल्याने अधिराचे मामा जयेश यांनी पोलिसांचे आभार मानले.
दोन वर्षांच्या अधिरासाठी चक्क पोलीस काकांनी आणला केक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 2:23 AM