लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दिवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याच्या हल्ल्यात शनिवारी अपघाती मृत्यू झालेल्या महिला प्रवासी विद्या पाटील यांच्या परिवाराची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, घटनेप्रसंगी हलगर्जीपणा करणाऱ्या ड्युटीवरील जीआरपी व आरपीएफ जवान व टीसी यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशा मागण्या उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मनोहर शेलार यांनी लोहमार्ग पोलीस आयुक्त, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केल्या.
विद्या पाटील या नोकरदार महिलेचा चोरट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर आहे. रेल्वे
प्रशासनाला कलंकित करणारी आणि प्रशासनाविषयी प्रवाशांच्या मनात प्रचंड संताप व तिरस्कार निर्माण करणारी आहे. या घटनेमुळे काही सवाल उपस्थित होत असून, त्याची उत्तरे प्रवाशांना मिळायला हवीत, असे शेलार म्हणाले. सध्या लोकल प्रवास अत्यावश्यक सेवेतील व राज्य शासनाने मान्यता दिलेले कर्मचारी वगळता सामान्य जनतेसाठी बंद असताना, सराईत गुन्हेगार रेल्वे स्टेशनवर आणि लोकलमध्ये तोही महिलांच्या डब्यात आलाच कसा? रेल्वेची सुरक्षा यंत्रणा आणि टीसी त्यावेळी स्थानकावर नव्हते, असाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ही घटना घडली तेव्हा ड्युटीवर असलेल्या दोन्ही यंत्रणांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना, टीसीला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. महिला डब्यात सुरक्षारक्षक का ठेवला नव्हता, याचेही उत्तर मिळाले पाहिजे. या अपघातातील मृत महिला ही गरीब असून, तिला तीन लहान मुली आहेत. त्यामुळे रेल्वेने ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान त्यांच्या कुटुंबाला द्यावे. तसेच पाटील यांच्या लहान मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
..............