लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात स्पीडगन कॅमे-यासह दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांना ठाण्याचे सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी हिरवा झेंडा दाखवून ती ठाणेपोलिसांच्या सेवेत सोमवारी दाखल केली.राज्यभरातील पोलिसांसाठी दिल्लीतील एका खासगी कंपनीने तंत्रज्ञान विकसित केलेली ९६ वाहने गृहविभागाने दिली आहेत. त्यातील इंटरसेक्टर व्हेइकल स्पीड गन विथ कॅमेरा अशी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली दोन वाहने ही ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात आली आहे. या वाहनांच्या इंजीनची मेकला तसेच पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.* या प्रकारांना बसेल आळाभारतीय बनावटीच्या सॉफ्टवेअरचे तंत्रज्ञान या वाहनांमध्ये असून त्याद्वारे विनाहेल्मेट जाणारे दुचाकीस्वार, कारमधून सीट बेल्ट न लावणारे चालक, महामार्गावर भरधाव वेगाने जाणारे वाहनचालक या सर्वांवर या वाहनांद्वारे ठाणे पोलिसांची यापुढे करडी नजर राहणार आहे. याशिवाय, वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावणारे, वाहनांना काळी फिल्म लावणारे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांना पोलिसांचा हा कॅमेरा अचूक टिपणार आहे. शिवाय, कोणताही वाद न घालता वाहनावरील क्रमांकाच्या आधारे स्वयंचलित यंत्रणेद्वारे ई-चलनाच्या दंडाची पावतीही संबंधित वाहनचालकाच्या मोबाइलवर पाठविली जाणार आहे. याच वाहनांमध्ये ब्रिथ अॅनालायझरची यंत्रणाही बसविण्यात आली असून एखाद्या मद्यपी वाहनचालकाला थांबवून फोटोसह त्याने किती प्रमाणात मद्यप्राशन केले, याचा अहवालही तत्काळ या यंत्रणेद्वारे मिळणार आहे. यापूर्वीच्या ब्रिथ अॅनालायझरमध्ये फोटो काढण्याची सुविधा नव्हती. आता मात्र फोटोसह मद्यपीचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांनाही चांगलाच चाप बसणार आहे. या अत्याधुनिक वाहनांचा वाहतूक शाखेत समावेश झाल्याने वाहतूक नियमांचे पालन न करणाºया वाहनचालकांवर कारवाई करणे त्यांना पुराव्यासह ओळखणेही सुलभ होणार असून वाहतूक नियमबद्ध, सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचे मेकला यावेळी म्हणाले.
‘‘या वाहनांमधील स्वयंचलित स्पीड गनमुळे तीन किलोमीटर अंतरावरील वाहनांचाही अचूक वेग मोजता येणार आहे. शिवाय, एकाच कॅमे-यातून दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांवरील वेगवेगळ्या वेगाची स्पीड गनकडून माहिती टिपली जाणार आहे. महामार्गावर दुचाकीला प्रतितास ४० किमी, कारसाठी ८० तर अवजड वाहनांना ६० किमीची वेगमर्यादा असेल, तर संबंधित वाहनांच्या वेगाप्रमाणेच या स्पीड गनकडून तशी दंडात्मक कारवाई ई-चलनाद्वारे केली जाणार आहे. ठाणे पोलिसांना या वाहनांचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे.’’सुरेश मेकला, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर.....................