मिरा रोड : शासनाने प्लॅस्टीकबंदी केली असतानादेखील अनेक महिन्यांपासून महापालिकेने प्लॅस्टीकविरोधातील कारवाई बंद करत, प्लॅस्टीक विक्रेत्यांना काही कोटींचा फायदा करुन दिल्याप्रकरणी आयुक्तांवरच गुन्हा दाखल करुन निलंबित करण्याच्या तक्रारीचे वृत्त लोकमतने सोमवारी देताच पालिकेने पुन्हा प्लॅस्टीक पिशव्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. गंभीर बाब म्हणजे महापालिकेने सुरु केलेल्या मंडईमध्ये, तसेच शहरात सर्वत्र प्लॅस्टीक पिशव्यांची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य शासनाने गेल्यावर्षी प्लॅस्टीक बंदी केल्यानंतर काही काळ पालिकेने कारवाई केली. त्याबद्दल सुरूवातीला पालिकेचे कौतूकदेखील झाले. परंतु नंतर मात्र पालिकेने कारवाई सपशेल बंदच करुन टाकली. त्यावरुन पालिकेवर टिकेची झोड उठली. तक्रारदारांनी प्लॅस्टीक पकडून दिल्यावर थोडीफार कारवाई पालिकेने केली. भार्इंदर पूर्वेच्या प्लॅस्टीक बाजारातील दुकानांमधील साठा पालिकेने चक्क सोडून दिल्याने पालिकेचे प्लॅस्टीक विक्रेत्यांशी साटंलोटं उघड झाले. चौफेर टिका होताच सुमारे २ हजार किलो प्लॅस्टीक पिशव्या नाईलाजाने पालिकेला जप्त कराव्या लागल्या होत्या.शहरात फेरीवाले, हॉटेल व दुकान वाल्यांपासून सर्वत्र प्लॅस्टीक पिशव्या, कंटेनर, चमचे, ग्लास आदींची सर्रास विक्री व वापर सुरु झाला. यामुळे खाड्या, नाले प्लॅस्टीकने भरले. कचऱ्यात प्लॅस्टीक प्रचंड वाढले. गाई आदींसह प्राण्यांच्या जीवाला धोका वाढला. पर्यावरणाचा ºहास आणि पाणी तुंबण्याची शक्यता वाढली. यातूनच थेट आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करुन निलंबीत करण्याच्या तक्रारी थेट शासनापासून राज्यपाल, लोकायुक्तांकडे केल्या गेल्या. लोकमतने सोमवारी याचे वृत्त देताच आयुक्तांनी उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टेंसह सर्व स्वच्छता निरीक्षकांना कारवाईचे आदेश सोमवारीच दिले.स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांनी सोमवारी रात्री पालिकेच्या रामदेव पार्कबाहेर प्लॅस्टीक पिशव्या विक्रीसाठी आलेल्या मार्शल नयन यादव (३६ ) रा. काशीबाई चाळ, आरएनपी पार्क, भार्इंदर पूर्व याला पकडून मीरा रोड पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला, तर पालिकेने ५ हजाराचा दंड वसूल करत पिशव्या ताब्यात घेतल्या. यादवचे साथीदार मात्र पळून गेले.३५ हजारापेक्षा जास्त दंड वसूलयाशिवाय मंगळवारीही पालिकेच्या काही स्वच्छता निरीक्षकांनी शहरातील फेरीवाले, दुकानवाले आदींवर कारवाई चालवली. बहुतांश प्लॅस्टीक पिशव्या बाळगणाऱ्यांकडून नियमानुसार ५ हजारांचा दंड पहिल्या गुन्ह्यासाठी घेणे आवश्यक असताना केवळ दीडशे रुपयेच दंड पालिका आकारत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या मंडईमधील फेरीवालेदेखील प्लॅस्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करत असल्याचे उघड झाले आहे. सुमारे ८० किलो प्लॅस्टीक पिशव्या जप्त करत ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला गेल्याची माहिती आयुक्तांनी दिली. प्लॅस्टीक विरोधातील कारवाई कठोरपणे राबवण्यासह कारवाई होते की नाही, यावरदेखील वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवणार असल्याचे आयुक्त खतगावकर म्हणाले.
प्लास्टिक पिशव्यांविरोधात पालिकेची पुन्हा मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:03 PM