- मनीषा कोटेकर, ठाणे वाढदिवस असला, घरी पाहुणे आले किंवा मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा योग येतो. अशा वेळी काही हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी आणून दिले जाते. नेहमीचे शुद्ध पाणी देण्याची विनंती केली तर आमच्याकडे ग्राहकांना चांगल्या आरोग्यासाठी हेच पाणी दिले जाते, तुम्हालाही हेच पाणी घ्यावे लागेल, असा सल्ला दिला जातो. बिलात पाण्याचे पैसे आकारले जातात; पण ग्राहकांना बाटलीबंद पाण्याची सक्ती करणे बेकायदेशीर आहे. जेवणाबरोबरच शुद्ध पाणी देणे ही हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी आहे.
भारतात एक कायदा आहे, जो १८०० च्या उत्तरार्धात तयार झाला होता. या कायद्यानुसार हॉटेलमध्ये कोणीही मोफत पाणी मागू शकते आणि तिथले स्वच्छतागृहदेखील वापरू शकतात. ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या या कायद्यात म्हटले आहे की, हॉटेल आणि लॉजमध्ये तो तुमचा ग्राहक असो किंवा नसो, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छतागृहांमध्ये प्रवेश द्यावा आणि ये-जा करणाऱ्यांना मोफत पाणी द्यावे. अनेक राज्ये आणि जिल्ह्यांनी सराय कायदा, १८६७ अंतर्गत हॉटेल्सची नोंदणी अनिवार्य केली आहे. पाणी पिण्याचा आणि हॉटेलमध्ये स्वच्छतागृह मोफत वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे.
बाटलीबंद पाणी घेतल्याने हॉटेलचालकांचा चांगला धंदा होतो. त्यामुळे वेटरने बाटलीबंद पाणी घेण्याची सक्ती केली तर मालकाकडे तक्रार करता येते. त्यातूनही काहीच फरक नाही पडला तर पोलिस किंवा ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.
याबाबत ॲड. विकास बर्गे म्हणाले, हॉटेलमध्ये आल्यावर ग्राहकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे हॉटेल व्यावसायिकांचे कर्तव्य आहे. त्यांनी ग्राहकांना बाटलीबंद पाणी विकत घेण्याची जबरदस्ती केली तर ग्राहकांना ते स्पष्ट शब्दांत नाकारण्याचा अधिकार आहे. तरीही खरेदी करण्यासाठी जबरदस्ती किंवा अट ठेवली तर ग्राहक न्यायालयात कलम ४२ (२) व कलम ४७ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसखाली तक्रार करता येईल; परंतु त्याबद्दलचा पुरावा असणे आवश्यक आहे. जेणेकरून कारवाई करणे सोपे होऊ शकेल.