कल्याण : लोकसभा निवडणूक आचार संहिता जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता दिसताच काही इच्छुक उमेदवारांनी दुसऱ्या पक्षाची कास धरण्यास सुरुवात केली आहे. आयराम गयरामवरून राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा भडका उडाला असून सोशल मीडियावर टीका टिपण्णी सुरू झाली आहे. आज ट्विटरवर राष्ट्रवादीचे नेते आमदारजितेंद्र आव्हाड व भाजप सचिव व आमदार नरेंद्र पवार यांच्यातील ट्विटर वॉर नेटिझन्सने चांगलेच एन्जॉय केले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक होत एक खोचक ट्विट केले होते. त्यावर भाजपा प्रदेश सचिव व कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी निशाणा साधत थेट जितेंद्र आव्हाड यांना मिश्कील ट्विट करत पलटवार केला आहे. याबाबत नरेंद्र पवार यांनी शरद पवारांचा राजकीय अभ्यास दांडगा आहे. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाचे कुणाचे घर कुणी कुणी फोडले असा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा पर्यायाने सर्वांच्या नजरा या बारामतीकडे वळतील. आणि हे सत्य आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. जे येतील त्यांच्यासोबत नाही तर त्यांच्याविना ही आमची कायम भूमिका असते. सुजय विखे पाटील पक्षात येण्यास इच्छुक होते, त्यांना घेतले, अजून असे बरेच दिग्गज नेते इच्छुक आहेत, त्यांनाही भाजपा नेतृत्व निश्चितपणे प्रवेश देईलच. जितेंद्र आव्हाडांनी नाराज न होता आपली जागा वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि भाजपा मुलं पळवतो असं वाटतं तर तुम्हाला मुलं सांभाळता येत नाही त्याचं काय ? अशी प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट “महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी”
आमदार नरेंद्र पवार यांचा मिश्किल पलटवार“भाजपला पोरं पळवणारी टोळी म्हणणारे जितेंद्र आव्हाड तुमच्या "साहेबांनी" कळा सोसून गणेश नाईक, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आनंद परांजपे यांना जन्म दिलाय का?”