लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांसाठी भाडेतत्त्वावर सायकलींच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे जाहिरातीचे हक्क पदरात पाडून घेणाऱ्या कंत्राटदाराचे हक्क रद्द करण्यासाठी महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांच्या सातत्याच्या प्रयत्नांनंतर १९ मार्च रोजी होणाऱ्या महासभेपुढे महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिलेल्या हक्कांबाबत विचार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. सायकल कंत्राटाबरोबरच महापालिकेने जाहिरातीच्या हक्काच्या बदल्यात केलेले अन्य करारही रद्द करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
ठाणे शहर `स्मार्ट सिटी' होणार असल्याची चर्चा घडवून मे. न्यूज मीडिया पार्टनर प्रा.लि. या कंपनीला शहरातील महत्त्वाच्या ५० ठिकाणी स्टॅण्डसाठी मोफत जागा दिली. त्याचबरोबर खेवरा सर्कल येथील महापालिकेच्या इमारतीतील दोन मजले मोफत दिले गेले. तर, सायकल स्टॅण्डवर होणाऱ्या जाहिरातींसाठी कोणताही कर आकारला जात नाही. त्याबदल्यात या कंपनीने सुमारे अडीच वर्षांपूर्वी केवळ ५०० सायकली दिल्या. या सायकलींची किंमत केवळ १७ लाख ५० हजार रुपये होती. इतकेच नव्हे तर महासभेत ठराव एका कंपनीच्या नावे अन् करार दुसऱ्या कंपनीच्या नावे, अशी किमयाही अधिकाऱ्यांनी साधली होती. त्याचबरोबर तत्कालीन आयुक्तांनी महासभेची दिशाभूल करून अवमानही केला होता, याकडे त्यांनी १ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष वेधले. तसेच महापालिकेची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कंत्राट रद्द करून जाहिरातफलक ताब्यात घेऊन निविदा काढाव्यात. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढू शकेल, अशी मागणीही केली होती.
अखेर, या मागणीवर महापालिका प्रशासनाने पहिले पाऊल टाकून १९ मार्च रोजी होणाऱ्या महासभेपुढे सायकल कंत्राटदाराला दिलेल्या हक्कांबाबत विचार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर महासभेत चर्चा केली जाणार आहे.
सायकल प्रकल्पांप्रमाणेच ५० चौक व परिसराच्या सुशोभीकरणातून ७५ हजार चौरस फुटांचे जाहिरातहक्क, शौचालये उभारण्याच्या बदल्यात सुवर्णा फाइब्रोटेक व तीर्था ॲडव्हर्टायझिंग कंपनीला जाहिरातींचे हक्क, लालबहादूर शास्त्री मार्गावरील तीन उड्डाणपुलांखालील जागेत व्हर्टिकल गार्डन व सुशोभीकरणाच्या बदल्यात जाहिरातींचे हक्क, १५ मोबाइल व्हॅनवरील जाहिरातींचे हक्क आदींमधून मोठ्या प्रमाणावर महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटेही रद्द करण्याबाबत प्रस्ताव आणावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.