कल्याण : राज्यात महापोर्टल पद्धतीने भरती प्रक्रिया केली जाते. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्याने डॉक्टर व अधिकाऱ्यांची भरती केली जात नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेसह राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.केडीएमसीतील रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांत विविध ९० पदे मंजूर करण्यात आली आहेत. २००८ पासून पाठपुरावा सुरू केले असताना २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने या पदांना मंजुरी दिली. तेव्हापासून या रुग्णालयांत डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नाही. डॉक्टरांची भरती होत नसल्याने या रुग्णालयात रुग्णांना पुरेशा आरोग्यसेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. दुसरीकडे डॉक्टरांची भरती प्रक्रिया मेगापोर्टलद्वारे करण्याचे आदेश असल्याने महापालिका ही मंजूर पदे भरू शकत नाही. त्यामुळे मेगापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करून राज्यातील विविध पालिका व महापालिकांना भरती प्रक्रियेसाठी दिलासा द्यावा. मेगापोर्टलऐवजी आॅफलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्यास डॉक्टरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मेगापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.केडीएमसीच्या रुग्णालयांतील रिक्त असलेली निम्मी पदे तातडीने भरावीत, तसेच महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांना मानधन कमी दिले जात असल्याने सरकारी रुग्णालयांत डॉक्टर काम करण्यास तयार नसतात. यासंदर्भात गुरुवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत डॉ. शिंदे यांची बैठक झाली. यावेळी एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजार रुपये मानधन व पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना ६५ हजार मानधन देण्याची तयारी दर्शवण्यात आली. मानधनावर डॉक्टर घेण्याचा महासभेने ठराव केला आहे. त्याला अधीन राहून मानधनावर रुग्णालयात डॉक्टर घेण्याची प्रक्रिया राबवावी, अशी सूचना डॉ. शिंदे यांनी केली. त्याला आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे.विविध आरोग्यसेवा लवकरच होणार सुरूकेंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरात शास्त्रीनगर रुग्णालयात पीपी तत्त्वावर क्रेष्णा डायग्नोस्टिक कंपनीतर्फे सीटी स्कॅन, एमआरआय आदी चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याच धर्तीवर रुक्मिणीबाई रुग्णालयातही ही सेवा पुरविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.आजदे येथील नागरी आरोग्य केंद्र महापालिकेकडे हस्तांतरित झाले असून ते पिसवली येथील ग्रामपंचायतीच्या जागेत सुरू केले जाणार आहे. याशिवाय, डायलेसिस रुग्णांसाठी डोंबिवली व कल्याणमध्ये असे प्रत्येकी एक सेंटर सुरू केले जाणार आहे. त्याचीही प्रक्रिया लवकरच पार पडेल, असे डॉ. शिंदे म्हणाले.रुक्मिणीबाई रुग्णालयाप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा करण्यात येणार आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी डॉ. शिंदे यांनी सायंकाळी ५ वाजता केली.
महापोर्टल भरती प्रक्रिया रद्द करा; श्रीकांत शिंदे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:35 PM