शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासह नवनगर रद्द व्हावे, या मागण्यांचे निवेदन घेऊन गुरु वारी शेतकरी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन शेतकरी बाधित होऊ नये, म्हणून हा महामार्ग रद्द करण्याचे साकडे घातले. या वेळी शेतकरी संघर्ष समितीने सुचवलेल्या अन्य पर्यायांचा विचार करण्याचे निर्देश त्यांनी रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना दिले.या वेळी शेतकरी संघर्ष समितीने मुंबई-नागपूर महामार्गासह धसई-कासगाव-नवनगरसाठी तालुक्यातील हजारो एकर सुपीक जमिनीसह अनेक शेतकरी बाधित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे सदर रस्ता वडपेपासून मोखावणेपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरण करून त्यास जोडावा व धसई-कासगाव परिसरातील मेगासिटी रद्द करून शासकीय जागेत ती वसवण्याची विनंती केली. भाजपाचे विधानसभा अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यामार्फत झालेल्या या भेटीवेळी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे उपस्थित होते. (वार्ताहर)
‘समृद्धी’ रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By admin | Published: October 15, 2016 6:42 AM