ठाणे : मुंबईतील लाइफ स्टाइल जगता यावे, यासाठी घरातून पळ काढणाऱ्या उत्तर प्रदेशमधील १५ वर्षीय मुलीचे स्वप्न ठाणे रेल्वेस्थानकात रद्द झालेल्या एक्स्प्रेसमुळे अधुरे राहिले. एका दक्ष प्रवाशाने ठाणे आरपीएफ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, आरपीएफने तिची चौकशी करून तिला गुरुवारी स्वगृही धाडले आहे.उत्तर प्रदेशमधून येणा-या गाड्यांचा शेवटचा थांबा हा लोकमान्य टिळक टर्मिनस आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेशातून आलेली एक्स्प्रेस १६ मार्चला कुर्ला येथे न जाता ती ठाण्यात रद्द करण्यात आली. त्यावेळी त्या एक्स्प्रेसमधील १५ वर्षीय मुलगी एकटी बसली होती. तिची माहिती प्रवासी चिंतामणी गुप्ता याने ड्युटीवर असलेले सहायक उपनिरीक्षक वाय.एस. यादव यांना दिली. त्यानुसार, यादव यांनी त्या मुलीला गाडीतून उतरवून ठाणे आरपीएफ पोलीस ठाण्यात नेले. तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्याकडे चौकशी केली. तिने मुंबईतील लाइफ स्टाइलप्रमाणे जीवन जगायचे आहे. त्यामुळे घरातून पलायन करून मुंबई गाठण्यासाठी एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे सांगितले. तसेच तिच्या मामाचा मुलगाही नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती तिने ठाणे आरपीएफला दिली. त्यानुसार, आरपीएफने त्यांच्याशी संपर्क साधून तिला त्यांच्या हवाली केले.
रद्द झालेल्या एक्स्प्रेसमुळे ‘तिचे’ स्वप्न अधुरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 2:25 AM