ठाणे : कोरोनाचे सर्व नियम पाळून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आयोजित करण्यात येणारी कळव्याची स्वागतयात्रा अखेर आयोजकांना रद्द करावी लागली आहे. लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे यंदाची मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारी स्वागतयात्रा यंदा होणार नसल्याचे स्वागतयात्रेचे आयोजक कळवा सांस्कृतिक न्यास तथा गावदेवी कळवण देवी गुढीपाडवा स्वागत समितीने जाहीर केले आहे.
रविवारी सायंकाळी समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात नियम पाळा, कोरोना टाळा आणि घरातच राहून गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करा, असा संदेश कळवावासीयांना देणार असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष गोविंद पाटील यांनी सांगितले. श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरात नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली जाते. या मुख्य यात्रे अंतर्गत कळवा, ब्रह्माड, वसंत विहार, घोडबंदर रोड याठिकाणी उपयात्रा काढली जाते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाने ठाणे शहरातील स्वागतयात्रा रद्द केली आहे. त्याऐवजी त्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी न्यासाने स्वागतयात्रा रद्द केली हाेती, पण कळव्याची स्वागतयात्रा माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत झाली हाेती. यंदा मात्र ती कडक निर्बंधांमुळे रद्द करावी लागली आहे. यामुळे १९ वर्षांनी पहिल्यांदाच या स्वागतयात्रेत खंड पडणार आहे.