कल्याण : केडीएमसीने स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जनजागृतीला सुरुवात केली आहे. ही मोहीम प्रभावी राबवण्यासाठी आयुक्त गोविंद बोडके यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या ३१ जानेवारीपर्यंत रद्द केल्या आहेत. या कालावधीत सुटी घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा फतवा जारी केला आहे. शनिवारी, रविवारची सार्वजनिक सुटीही रद्द केली आहे.
स्वच्छता सर्वेक्षणासाठी दोन दिवसांत दिल्लीहून पथक येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी परिपत्रक काढून आदेश जारी केले आहेत.स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत कल्याण-डोंबिवलीतील प्रभागांमध्ये पथनाट्य, वासुदेवाच्या माध्यमातूनही स्वच्छतेविषयी प्रबोधन केले जात आहे. केडीएमसीच्या मालमत्ता, सरकारी कार्यालये आणि शाळांच्या वास्तूंच्या भिंतींवर रंगरंगोटी करून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. सर्वेक्षणात गुणांकन उंचावण्याचे ध्येय महापालिकेने बाळगले आहे. पालिका स्वच्छता परिषद घेणार असून यात व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ अशी स्पर्धाही घेतली जाणार आहे. स्वच्छता अॅप डाउनलोड करून स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये आपला सहभाग दर्शवून महापालिकेचे गुणांकन उचवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या कालावधीत मूल्यमापनाच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी परिपूर्ण तयारी करणे आवश्यक असल्याने अधिकारी आणि कर्मचाºयांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. सर्वेक्षण कालावधीत सहायक आयुक्त आणि सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक ठिकाणची पाहणी करून अहवाल दररोज उपायुक्तांमार्फत सादर करण्यात यावा, असे आदेश आयुक्त बोडके यांनी दिले आहेत.
ज्याठिकाणी कर्मचारी उपस्थित नसतील अथवा सर्वेक्षणअंतर्गत ठिकाणी साफसफाई नसल्यास मुख्य आरोग्य निरीक्षकांना व्यक्तिश: जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक आयुक्तांनी जारी केले आहे.शनिवारी-रविवारीही कार्यालये सुरूसर्वेक्षणाच्या अनुषंगाने शनिवारी आणि रविवारचीही सुटी रद्द करण्यात आल्याने शनिवारी घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सर्वेक्षणाशी निगडित असलेले विभाग सुरू होते. रविवारीही संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.