ठाणे : माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबच्या जागेवर आता टाटा कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे हबसाठी तयार केलेल्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. परंतु, या हॉस्पिटलच्या कामाला भाजपच्या नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या महासभेत विरोध दर्शविला. टाटा हॉस्पिटल हे सक्षम नाही का? त्यासाठी जितो संस्थेची मदत कशासाठी घ्यायला हवी, असे प्रश्न करून या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला. परंतु, टाटा हॉस्पिटल केवळ येथे डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध करून देणार आहे. वास्तू उभारण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होणार नाही, त्यामुळे या कामासाठी जितोची मदत घेतल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यानुसार ज्यांच्या काही समस्या असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून सविस्तर प्रस्ताव पुन्हा महासभेत सादर केला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी देण्यात आली.
ठाणे महापालिकेने माजिवडा येथील इमारतीत ग्लोबल इम्पॅक्ट हब सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या ठिकाणी नवे रोजगार उपलब्ध करून दिले जाणार होते. यासंदर्भात निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, मागील वर्षी कोरोनाची साथ आल्याने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात कोविड रुग्णालय सुरू केले आहे. आता त्याच ठिकाणी टाटांच्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव आणला आहे. यानुसार टाटा कॅन्सर हॉस्पिटल बरोबर जितो आणि महापालिकेच्या माध्यमातून हे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. याच मुद्यावरून भाजपचे नगरसेवक गुरुवारी झालेल्या महासभेत आक्रमक झाल्याचे दिसले.
टाटा कॅन्सर हॉस्पिटल सर्व सेवा देण्यास सक्षम आहे, त्यांच्याकडून सर्व काम करून का घेतले जात नाही. केवळ जितोला यात घेण्यासाठीच असा प्रस्ताव तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला. परंतु, महापौर नरेश म्हस्के यांनी जितोने कोरोना काळात खूप महत्वाचे काम शहरासाठी केल्याचे सांगितले. टाटा रुग्णालयाकडून केवळ स्टाफ पुरविला जाणार असून रुग्णांची सेवा केली जाणार आहे. परंतु, इमारतीमधील इतर कामे करण्यास ते तयार नसल्याने जितोची मदत घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार याचा सविस्तर प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देण्यात आली.