ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे पाचशेपेक्षा अधिक जणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये १६ महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. तर सुमारे ९३ जणांनी रक्तदान केल्यामुळे ९३ बाटल्या रक्ताचे संकलन करता आले आहे.
१२ डिसेंबरला पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालय, तुळजाभवानी मंदिराजवळ, गणेशवाडी- पांचपाखाडी येथे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. माजी मंत्री, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस यांनी हे शिबिर आयोजित केले असता त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला असून ५०० जणांनी त्याचा लाभ धेतला आहे.
या शिबिरात शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी, मधुमेह, कॅल्शियम, मणक्याचे आजार, हृदयरोग तपासणी; रक्तदाब व ईसीजी तपासणी करून घेतली. या शिबिरात काही आजारांवरील औषधांचे तसेच २७९ जणांना चष्म्यांचेही मोफत वाटप करण्यात आले. सुमारे ८७ जणांना श्रवण यंत्र वापरण्याची सूचना यावेळी डॉक्टरांनी केली असून त्यांना अल्पदरात श्रवणयंत्र वाटप सोमवारी करण्यात येणार आहे. तर १६ महिलांनी आपली कर्करोग तपासणी करून घेतली. यादरम्यान शिबिरास डॉ. आव्हाड यांनी भेट दिली असता त्यांनीही स्वतःचीही आरोग्य तपासणी करून घेतली.