अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याचा उमेदवार ठरत नसला तरी शिंदेसेना व भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. उमेदवार दोन्हीपैकी कुठल्याही पक्षाचा असला तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय असल्याचा संदेश जनतेमध्ये जावा, हा यामागील हेतू आहे. शिंदेसेनेकडून प्रभागनिहाय मेळावे घेण्यावर भर देण्यात आला आहे. भाजपने वॉरियर्सच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी टिफिन बैठकांचा सपाटा लावला आहे.
महायुतीचा भाग असलेला अजित पवार गट उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या भागांत विभागवार मेळावे झाले. या तीन शहरांपैकी ठाण्यात महापालिकेत शिंदेसेनेची सत्ता आहे, तर नवी मुंबई व मीरा-भाईंदरमध्ये भाजपचा जोर आहे. आता शिंदेसेनेकडून आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रभागनिहाय बैठका घेण्यावर जोर दिला जात आहे. वागळे, कोपरी, बाळकुम, घोडबंदर आदींसह शहराच्या इतर भागांत बैठका घेतल्या जात आहेत.
भाजपने ठाणे मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने जोरबैठका सुरू केल्या आहेत. बूथ स्तरावर मतांची बांधणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. २५० वॉरियर्सच्या माध्यमातून वॉर्डनिहाय बैठका घेतल्या जात आहेत, तसेच प्रभागात जाऊन सर्व्हे करण्याचे काम हाती घेण्यात आले. मतदारांच्या याद्या तपासणे, सुट्यांचा काळ असल्याने मतदार मतदानाच्या दिवशी गावाला जाणार आहेत का, याची माहिती घेणे, मतदानाच्या दिवशी आपला मतदार घराबाहेर पडून मतदानाला हमखास येईल यासाठी नियोजन केले जात असल्याची माहिती भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.
मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा टिफिन बैठकांचा सपाटा भाजपने लावला आहे. पदाधिकारी घरून आपापले जेवणाचे डबे घेऊन येतात. एकत्र बसून जेवताना निवडणुकीत कशा पद्धतीने काम करायचे, कुठे काय परिस्थिती आहे, याबाबत माहितीचे आदानप्रदान करायचे व वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्यायचे, असा उपक्रम राबविला जात आहे.