ठाणे : प्रचाराची रणधुमाळी दिवसभर सुरु राहिल्यावर रात्री दहानंतर उमेदवारांच्या कार्यालयाबाहेरील दिवे विझतात. मात्र आतमध्ये बैठका, पुढील प्रचाराचे नियोजन, वेगवेगळ््या विभागातील ‘प्रभावशाली’ व्यक्तींसोबत बैठका, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खबरी काढणे, पैशाची तजवीज करणे आणि एरिया बांधण्याकरिता फिल्डिंग लावणे असे नानाविध खेळ रात्रीस सुरु असतात. बहुतेक सर्व प्रमुख उमेदवार पहाटे चार-पाच वाजेपर्यंत याच खटपटी-लटपटीत असतात. प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने रोड शो, रॅली, डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा कार्यक्रम नियमित सुरु आहेच. मात्र अलीकडे लोकप्रिय ठरलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या सिरिअलप्रमाणे रात्री ११ च्या नंतर मिटींग, भेटीगाठी सुरु असून हा ‘प्रचार’ ठाणेकरांना दिसत नाही. मात्र खरीखुरी बांधणी याच रात्रीच्या डावपेचातून होत असल्याचे उमेदवारांचे निकटवर्तीय सांगतात. बहुतांश उमेदवारांची कार्यालये निवासी वस्तीत आहेत. पहाटेपर्यंत तेथे मोटारी येऊन उभ्या राहतात. माणसांची लगबग, त्यांच्या बोलण्याचे आवाज, कार्यकर्त्यांच्या मोबाईल फोनचा खणखणाट सुरू असतो. काही भागात तर पहाटे चार-पाचपर्यंत हा खेळ सुरु असतो. पहाटे ठाणेकरांचा दिवस सुरु होतो तेव्हा उमेदवारांची कार्यालये खऱ्याअर्थाने बंद झालेली असतात. मग सकाळी साडेआठ-नऊनंतर पुन्हा तेथे लगबग सुरु होते. ठाण्यात एका वॉर्डात ३५ हजारांपासून ते ५७ हजारांपर्यंत मतदार आहेत. या प्रत्येक मतदारापर्यंत पोहचता येणे शक्य नसल्याचे अनेक उमेदवारांना माहित आहे. परंतु, त्याठिकाणी पोहचण्यासाठी ते नाना शक्कल लढवत आहेत. हा रात्रीस खेळ चाले पुढील तीन ते चार दिवस आणखीनच जोर धरणार असून यामधून अनेक उलाढाली होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
उमेदवारांचे ‘रात्रीस खेळ चाले’
By admin | Published: February 15, 2017 4:44 AM