जितेंद्र कालेकर / ठाणेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका उमेदवाराने त्याच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरचे भाडे व अनामत रक्कम यापोटी दिवसाकाठी ७० हजार रुपये भरण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने त्याचे डोळे पांढरे झाले. अखेरीस, राज ठाकरे यांची छबी असलेले हे पोस्टर पडदा टाकून झाकून ठेवण्याची नामुश्की त्याच्यावर ओढवली आहे. आयोगाच्या भरमसाट दरआकारणीमुळे सर्वच पक्षांचे उमेदवार वैतागले आहेत. मात्र, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी त्यांची अवस्था झाली आहे.मनसे उमेदवाराने कार्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरकरिता त्याला प्रतिचौरस फूट १५० रुपये भाडे आणि १०० रुपये अनामत रक्कम अशा २५० रुपये चौफू या दराने ३०० चौरस फुटांच्या फलकासाठी एका दिवसाचे ७० हजार रुपये भरण्यास सांगितले. अनामत रक्कम वगळली, तरीही दिवसाकाठी ४५ हजारांचा दर वसूल केला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेल्या बॅनरवर पडदा टाकून ते झाकून ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला. उमेदवारांना ८ लाख रुपये खर्चाची जी मर्यादा आखून दिली आहे, त्यामध्ये एवढ्या जास्त रकमेचे एकदोन पोस्टर्स लावणे अशक्य असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. आयोगाच्या भरारी पथकाने आक्षेप घेतल्यामुळे नाइलाजास्तव आपल्याच नेत्याच्या पोस्टरवर पडदा टाकावा लागल्याचे मनसे उमेदवाराने ‘लोकमत’ला सांगितले. आधी हा दर ५० रुपये प्रतिचौरस फूट प्रतिदिवस होता. त्यामुळे दिवसाकाठी १५ हजार रुपये भाडे आकारणी केली जात होती. आता ती थेट ४५ हजार रुपये रोज होते. ही भरमसाट दरवाढ हा उमेदवारांची कोंडी करण्याचा प्रकार असल्याचे एका उमेदवाराने सांगितले. उमेदवारांनी कार्यालयाच्या ठिकाणी कमान उभारल्यास त्याकरिता एकाच वेळी पाच हजार रुपयांचा दर आकारून परवानगी दिली होती. मात्र, अचानक मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देऊन कमानी काढून टाकण्यास भाग पाडले. आयोगाच्या रोज बदलणाऱ्या या नियमांमुळे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हैराण असल्याचे काहींनी सांगितले.
आयोगाच्या जाहिरात दरआकारणीने उमेदवार त्रस्त
By admin | Published: February 17, 2017 1:58 AM