उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयाची वीज मंगळवारी सकाळ पासून रात्री रात्री ८ वाजे पर्यंत गुल झाल्याने, रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. विजेअभावी रुग्णालयात कँडल लाईट डिलिव्हरी करण्यात आली. नियोजित सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हास्तरीय रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून दररोज शेकडो रुग्ण रुग्णालयात उपचार करण्यासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात दररोज ९५० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत असून महिन्याला ४०० तर वर्षाला ६ हजार पेक्षा जास्त मुले जन्म घेतात. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून वीज गायब झाली. तसेच इन्व्हर्टर नादुरुस्त झाल्याने, रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य पसरले. रुग्ण उकाळ्याने हैराण झाले असून सर्व शस्त्रक्रिया विजे अभावी पुढे ढकलण्यात आल्या. तर आपत्कालीन परिस्थितीतील प्रसूतीगृहाचे रुग्ण कळवा व मुंबई रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र नैसर्गिक प्रसूती मात्र कँडलच्या लाईट मध्ये करण्यात आल्याची चर्चा रुग्णालयात रंगली आहे.
मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ मनोहर बनसोडे यांची नियुक्ती झाल्यावर, त्यांनी कर्मचारी व डॉक्टरांच्या बेबंदशाहीला आळा घातला. तर रुग्णालयातील समस्या बाबत वारिष्टना वेळोवेळी पत्राद्वारे कळविले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत होत असलेली सर्व कामे रेंगाळली आहेत. याचाच फटका मंगळवारी रुग्णालयाला बसला. जुन्या इन्व्हर्टर जागी नवीन इन्व्हर्टरची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र ती मागणी पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला अपयश आले. विजे अभावी सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलून गंभीर झालेल्यां रुग्णांना इतरत्र पाठविण्यात आले. तर प्रसूती कॅडल लाईट मध्ये करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली. विजेच्या समस्या बाबत महावितरणाला लेखी कळविले असून ब्लड बँक, लहान मुलांचा वॉर्ड आदी ठिकाणी वीज असल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. तर मंगळवारी वीज नसल्याने, रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी कॅडलची मदत घेतली. त्यात काय वाईट, परिस्थिती नुसार वागावे लागते. असेही डॉ बनसोडे म्हणाले.
मध्यवर्ती रुग्णालयातील कामे ठप्प आमदार कुमार आयलानी यांनी डोळ्याचा शस्त्रक्रिया विभाग, वातानुकूलित शवागृह, रुग्णालय अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आदींसाठी निधी दिला. मात्र बहुतांश कामे ठप्प पडल्याचे चित्र आहे.