- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार प्रकाश नुलकरच्या पोलीस कोठडीत सोमवारी आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. पोलिसांनी त्याचे परळचे घर आणि कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक चिप्सचा साठा जप्त केला असून, त्याच्या आणखी काही साथीदारांचा तपशील पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.पेट्रोलपंप महाघोटाळ्यात आतापर्यंत २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी लोअर परळच्या प्रकाश नुलकर आणि डोंबिवलीच्या विवेक शेट्येची भूमिका महत्त्वाची असल्याचे निष्पन्न झाले. डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करणारे सॉफ्टवेअर त्यांनीच तयार करून विकले. प्रकाशच्या विदेशवाऱ्याही तपासामध्ये समोर आल्या आहेत. डिस्पेन्सिंग युनिटचे उत्पादन करणाऱ्या चिनी कंपनीने आपणास देखभाल, दुरुस्तीचे कंत्राट दिले होते. त्यासाठी आपण परदेशात गेल्याचे नुलकरने सांगितले. मात्र, या दाव्यापृष्ट्यर्थ तो कोणताही पुरावा देऊ शकलेला नाही. नुलकरने चिप्सची विक्री कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये केली, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यातील तथ्य पोलीस तपासून बघत आहेत. त्यानुसार, पंपांवर छापासत्र सुरू असून, ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सूत्रधाराकडून इलेक्ट्रॉनिक चिप्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:23 AM