विरार : बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पोलिसांची कथा ताजी असतानाच एका वाहतूक पोलिसाने एका टेम्पोचा पाठलाग करून नंतर ड्रायव्हरला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना लोकमतचे फोटोग्राफर हनीफ पटेल यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून वाहतूक पोलिसांची दादागिरी चव्हाट्यावर आणली आहे. बुधवारी दुपारी समतानगर परिसरात ही घटना घडली. वाहतूक पोलीस एन.टी. झेंडगे यांनी एका टेम्पोला थांबवण्याची खूण केली. मात्र, ड्रायव्हर सुरज पाटील त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला. त्यामुळे संतापलेल्या झेंडगे यांनी टेम्पोचा पाठलाग करून त्याला थांबवले. नंतर, टेम्पोत बसून ड्रायव्हरला शिवीगाळ करीत गालावर आणि पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली. पाटील यांनी आपली चूक काय, अशी विचारणा केली असता संतापलेल्या झेेंडगे यांनी जास्त बोललास तर बत्तीशी तोडण्याची धमकी दिली. हा प्रकार पटेल यांच्या लक्षात येताच त्यांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करून वाहतूक पोलिसांची वसईत सुुरू असलेली दादागिरी चव्हाट्यावर आणली. या घटनेनंतर ड्रायव्हरवर दंडात्मक कारवाई करून झेंडगे यांनी सोडून दिले. वसईत एका वाहतूक पोलिसाची दादागिरी समोर आली आहे. एका वाहनचालकाला चक्क त्याच्याच गाडीत बसून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर त्याला त्याची बत्तीशी तोडण्याची धमकी दिली. त्याच्या गालावर बुक्क्यांनीदेखील मारहाण केली. मोबाइलमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाल्याने या ट्रॅफिक पोलिसाची दादागिरी समोर आली. आता प्रशासन कार कारवाई करते या कडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
पोलीस कॅमेऱ्यात ‘कैद’
By admin | Published: April 23, 2016 1:50 AM