ठाणे : आलिशान मोटारकारने सोमवारी पहाटे दुचाकीचालकाला उडविणाऱ्या अभिजित नायर (वय २६, रा. ठाणे) याची अपघातग्रस्त कार जप्त केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे यांनी मंगळवारी दिली. नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अभिजितला ताब्यात घेतले आहे.
या घटनेत दुचाकीचालक दर्शन हेगडे (वय २१, रा. ज्ञानेश्वर नगर, ठाणे) यांचा मृत्यू झाला. संत ज्ञानेश्वर नगरातील साईकृपा चाळीत राहणाऱ्या दर्शनच्या कुटुंबीयांची मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी फरार आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली.
घटनास्थळी मिळालेल्या मोटारकारच्या नंबर प्लेटच्या आधारे नायर याच्या मोटारकारचा नौपाडा पोलिसांनी शोध घेतला. तो बंगळुरूमधील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याचे वडील सुरेश बाबू नायर हे खासगी सुरक्षा सुपरवायझर आहेत. कारच्या शौकिन असलेल्या अभिजित याने अलीकडेच पावणेचार लाखांत जुनी मर्सिडीज मोटारकार घेतल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरही वेगवेगळ्या महागड्या कारसोबत त्याचे फोटो असल्याचे आढळले आहे.