बदलापूर : सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकून पडल्याची घटना बदलापुरात घडली आहे. यानंतर मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी ही गाडी बाहेर काढण्यात आली. बदलापुरात बेलवली आणि कात्रप परिसराला जोडणारा रेल्वे रुळाखालचा सबवे आहे. या सबवेमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचत असते. आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या सबवेमध्ये गुडघाभरपेक्षा जास्त पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने एका इनोव्हा चालकाने त्यात गाडी टाकली आणि सबवेच्या मधोमध अडकून पडली.
सब वेमध्ये जवळपास अर्धा तास ही गाडी चालकासह अडकली होती. अखेर चालकाने मदतीसाठी पाचारण केल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ही गाडी बाहेर ओढून काढण्यात आली. या घटनेमुळे बदलापुरातील सबवेत दरवर्षी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होऊ शकत नसेल, तर किमान पावसाळ्यापुरते तरी हे सबवेच बंद करावेत, अशी मागणी आता होऊ लागली आहे.