मीरारोड : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून घेतलेली कार्डियाक रुग्णवाहिका व वातानुकूलित मोक्षरथाचे लोकार्पण मंगळवारी मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात करण्यात आले. ईडीचा ससेमिरा आणि कौटुंबिक कारणांनी गेले काही महिने सरनाईक शहरात आले नव्हते.
१२ जुलै ते २४ जुलै या काळात शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मीरा भाईंदर शहरात त्याचा शुभारंभ केल्याचे आमदार सरनाईक म्हणाले. कार्डियाक ॲम्ब्युलन्स अत्याधुनिक असून, त्यात ऑक्सिजनची सुविधा, एक डॉक्टर, परिचारिका यांची बसण्याची सोय आहे. स्मशानभूमी वा दफनभूमीपर्यंत पार्थिव नेण्यासाठी वातानुकूलित मोक्षरथ तयार केला असून, शहरात मोक्ष रथ २४ तास विनामूल्य सेवा देणार आहे. पार्थिव मूळ गावी घेऊन जायचे असते, त्यावेळी शीतपेटीची सुविधा असलेला वातानुकूलित मोक्षरथ वापरता येईल, असे आमदार सरनाईक म्हणाले. यावेळी मुख्यालयात गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांनी मास्कही घातले नव्हते.