ठाणे : मराठा आरक्षणापाठोपाठ विधानसभा उपाध्यक्षपद आणि विधान परिषद उपसभापतीपदाकरिता भाजपाने शिवसेनेला संधी दिल्याने या दोन्ही पक्षांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत ठाण्यातून शिवसेना आणि भाजपामधून लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या डझनभर इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. त्यामुळे आतापासूनच युती होऊ नये, म्हणून काहींनी देव पाण्यात घातले आहेत.
काही महिन्यांपूर्वी स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता अपेक्षेप्रमाणे त्या घोषणेपासून घूमजाव करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत युतीच दोन्ही पक्षांना तारेल, याची जाणीव भाजपा-शिवसेनेला झाल्याने या दोघांमधील तणाव आता हळूहळू का होईना कमी होऊ लागला आहे. येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. त्यापाठोपाठ आॅक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. राम मंदिरावरून शिवसेनेने भाजपाला आव्हान दिले असले, तरी दोन्ही पक्षांची या विषयावरील भावना व मागणी एकच आहे. शिवसेनेला जातीवर आधारित आरक्षण आतापर्यंत मान्य नसतानाही मराठा आरक्षण लागू करण्यातही उभयतांमध्ये एकवाक्यता दिसली आहे. गेली चार वर्षे रिक्त ठेवलेले विधानसभा उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले आहे, तर विधान परिषदेच्या उपसभापतीपदावरील शिवसेनेची दावेदारी मान्य करण्यास भाजपा तयार आहे. त्यामुळे युतीमध्ये असलेला तणाव झपाट्याने कमी होण्यास हे वातावरण पोषक मानले जात आहे. त्यामुळे राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच ठाण्यातील दोन्ही पक्षांमधील संभाव्य उमदेवारांचे टेन्शन मात्र वाढले आहे.
यूती होणार नसल्याची गृहीत धरुन मागील दीड वर्षापासून दोन्ही पक्षातील इच्छुक आपापल्या संभाव्य मतदारसंघात कामाला लागले होते. काहींनी प्रचाराची सुरुवात केली आहे. ठाणे शहर मतदारसंघ भाजपाकडे आहे. येथून लढण्याकरिता शिवसेनेतील नरेश म्हस्के, देवराम भोईर, संजय भोईर, अनंत तरे, केदार दिघे यांच्यासह भाजपामधून डॉ. राजेश मढवी यांनीही तयारी सुरू केली आहे. या सर्वांनी दीड वर्षापासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी भाजपाचे अॅड. संदीप लेले, भरत चव्हाण यांनी तयारी केली. ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना शह देण्यासाठी भाजपाचे मनोहर डुंबरे आणि शिवाजी पाटील यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकही संधी सोडलेली नाही. पाटील यांनी ठाण्यातील सर्वात मोठी दहीहंडी उभारून त्याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले.युती झाली तर ठाणे शहर मतदारसंघ पुन्हा भाजपाच्या वाट्याला जाणार असून कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघांसाठी फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक उमेदवारांच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळणार आहेत.
या मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांनी दीड मोठा खर्च केला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्रत्येक मंडळांना देणग्या दिल्या. कुणाच्या खिशाला किती खार लागला, याची खुसखुशीत चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. काहीतरी चमत्कार घडेल व युती होणार नाही, या अंधुक आशेवर इच्छुकांची भिस्त आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर ठाण्यातील अनेक इच्छुकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली होती. यूती नाही झाली तर एरव्ही दोन्ही पक्षांमध्ये होणारे मतदारसंघांचे वाटप टळेल आणि आपल्याला नक्की संधी मिळेल, या आशेवर इच्छुक उमेदवारांनी तयारीही सुरु केली.