ठाणे : किसनगरच्या क्लस्टरच्या मसुद्यावर सिडको आणि महापालिकेच्या स्वाक्षऱ्या झाल्या असतांनाच केवळ निवडणुका डोळ्यासमोरच ठेवून हा करार करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केला आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे गाजर दाखविले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर बॅनरबाजी करीत आता तरी जागे हो ठाणोकर असे आवाहन ठाणोकरांना केले आहे.तसेच यावेळी गाजरचे वाटपही करण्यात आले.
मागील काही दिवसापासून ठाण्यात राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असा सामना रंगत आहे. एकीकडे काही झाले तरी आघाडी होणार असल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे वारंवार सांगत आहे. प्रत्येक सभेला ते आर्त साद घालत आहेत, परंतु स्थानिक पातळीवरील राजकारण काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. खारेगाव रेल्वे क्रॉसींगच्या मुद्यावरुन शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी सामना रंगल्याचे ठाणेकरांनी पाहिले आहे. या पुलाचे श्रेय हे आमचेच असल्याचा दावा दोन्ही पक्षाकडून करण्यात आला. त्यानंतर पुन्हा या दोनही पक्षातील स्थानिक मंडळींनी एकमेकांवर चिखलफेकही केली आहे.
आजही ही चिखलफेक कमी झाली नसल्याचेच दिसत आहे. खारेगाव रेल्वे क्रासींग उड्डाणपुलाचे श्रेय घेऊ पाहणा:या शिवसेनेला राष्ट्रवादीने उत्तर दिले असतांनाच आता क्लस्टरचे श्रेयही शिवसेनेकडून घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंत्तीच्या निमित्ताने ठाणे महापालिका आणि सिडको यांच्यात किसनगर नगरच्या क्लस्टरच्या मसुद्यावर स्वाक्ष:या झाल्या आहेत. त्यानुसार आता किसनगरच्या क्लस्टरचे काम सुरु होईल असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
परंतु लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका असल्या की शिवसेनेकडून क्लस्टरचे हत्यार बाहेर काढले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच क्लस्टरचा नारळ वाढविण्यात आला होता. परंतु त्यानंतरही किसननगर भागात एकही विट क्लस्टरची रचण्यात आलेली नाही. त्यानंतर आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून पुन्हा क्लस्टरचे गाजरच दाखविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी केला आहे. त्यामुळे क्लस्टरचं पुन्हा एकदा गाजर अशा आशयाचे बॅनरच त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर लावले आहे. क्लस्टर व्हावे ही तमाम ठाणोकरांची इच्छा आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर वारंवार त्याचे गाजर दाखविणो अयोग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु राष्ट्रवादीने पुन्हा एकदा या माध्यमातून शिवसेनेवर थेट निशाना साधण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.