ठाणे : गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या त्रिकुटासह त्यांच्याकडून कमी किमतीत त्या विकत घेणाऱ्या ठाण्यातील एका व्यावसायिकास वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली.वागळे इस्टेट भागातील लालबहादूर शास्त्री रोडवर उभ्या केलेल्या चार गाड्यांच्या बॅटऱ्या २० एप्रिल रोजी रात्री चोरी झाल्या होत्या. किसननगरातील अब्दुल रहेमान अताउल्ला शेख, नामदेव मोरे, अनिल शेळके आणि चंद्रकांत बरे यांनी एकाच ठिकाणी उभ्या केलेल्या गाड्यांमधून ही चोरी झाली होती. टाटा टेम्पोमधून अॅमेरॉन कंपनीच्या प्रत्येकी ७ हजार रुपयांच्या बॅटऱ्यांची चोरी झाल्याचे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी समजले. वागळे इस्टेट पोलिसांनी तपास करून याप्रकरणी रंगबहादूर यादव, घनश्याम चौधरी आणि अश्वनी गौड यांना अटक केली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी या बॅटऱ्या गुलाब सिंह याला कमी किमतीत विकल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी गुलाब सिंह यालाही पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून अॅमेरॉन कंपनीच्या चोरीच्या चारही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींच्या चौकशीतून बॅटरीचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वागळे इस्टेट पोलिसांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांना अटक
By admin | Published: May 02, 2017 2:36 AM