अनिकेत घमंडी/लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे दालन शहरातील शिव मंदिर रोडवरील नानानानी पार्कच्या जागेत साकारणार आहे. या दालनासाठी ३० लाखांचा निधी मिळाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहा महिन्यांत हे दालन उभारून दिवाळीत ते नागरिकांसाठी खुले केले जाईल. बाळासाहेबांचे विचार या दालनाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी दिली. मोरे म्हणाले की, हा भूखंड अनेक वर्षांपासून नानानानी पार्कसाठी राखीव आहे. या ठिकाणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण येतात. पण, काही उपद्रवी व्यक्तींमुळे अंधाराचा फायदा घेत मैदानाचा दुरुपयोग होतो. ती टाळण्यासाठी तेथे हे दालन साकारले जाईल. तेथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे दालनाची सुरक्षा अबाधित राहील. व्यंगचित्र दालनासाठी मिळालेल्या निधीतून दालनाबरोबरच मैदानाचे सुशोभीकरण आणि सौरदिवे लावले जातील. या दालनात बाळासाहेबांनी रेखाटलेली शंभरहून अधिक निवडक व्यंगचित्रे लावली जातील. अत्याधुनिक पद्धतीने त्याची निगा राखली जाईल. मैदानालगतच स्मशानभूमी आहे. तेथे येणाऱ्या नागरिकांच्या विसाव्याची व्यवस्थाही या मैदानात केली जाईल. त्यामुळे त्यांची गैरसोय कमी होईल, असे मोरे म्हणाले.शिवसेना पक्ष केवळ हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. देशावर किती परकीय आक्रमण होऊ देत, पण त्याला हाताच्या, शब्दांच्या आणि रेषाक्षरांनी कसे फटकारले जायचे, हे बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांतून पाहायला मिळते. ती ताकद केवळ साहेबांच्या व्यंगचित्रांमध्येच होती. हे दालन ही हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांची सेवाच असल्याचे मोरे म्हणाले.बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांद्वारे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची महती कळावी, परखड, स्पष्ट आणि बोचरी टीका असणारे त्यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचावेत, अशी प्रांजळ अपेक्षा असल्याचे मोरे म्हणाले, जेणेकरून बाळासाहेबांच्या हिंदुत्व विचारांचा झंझावात चिरंतन राहील. नव्या पिढीला त्या विचारांचे महत्त्व, बाळासाहेबांचे योगदान समजेल. - राजेश मोरे, सभागृह नेते, केडीएमसी
डोंबिवलीत शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचे दालन
By admin | Published: May 06, 2017 5:56 AM