जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांनी विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याकरिता भाजपची पदाधिकारी असलेल्या एका महिलेविरुद्ध षडयंत्र रचून तिला मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. यातील आरोपींना अटक करण्याची मागणी या महिलेने केली आहे. भाजपच्या या महिला पदाधिकाऱ्याने माजी नगरसेवक राजन किणे यांच्यासह गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन वरील दावा केला.
आव्हाड यांच्याविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याकरिता आणि त्याचा बदला घेण्याच्या उद्देशातून खोटा गुन्हा दाखल करून कट रचला, खोटे पुरावे देऊन पोलिस आणि न्यायालयाची दिशाभूल केली. न्यायालयात खोटी याचिका दाखल केली. खोट्या चित्रफिती तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या, असा आरोप या महिलेने केला. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे कौटुंबिक वाद होऊन परिवाराचे मानसिक स्वास्थ बिघडले आणि परिवाराला मानसिक त्रास झाल्याचा दावा या महिलेने केला.
मुंब्र्यातील इस्टेट एजंट शबाना सोंधी (४०) हिला पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलमातील गुन्ह्यात अटक केली आहे. इतरही आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.