मीरारोड - मीरारोडच्या राम नगर येथील प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण व शिवीगाळ करून गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या उपशहर अध्यक्ष , कार्यकर्त्यांसह एका अन्य ग्रुपच्या कार्यकर्त्यांवर तब्बल सहा दिवसांनी काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये १६ ऑगस्ट रोजी रविवारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते. त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता . कार्यालयात अधिकारी व कर्मचारी दारूची पार्टी करत होते आणि आम्हाला पाहून ग्लास व बाटली खाली फेकून दिल्याचा आरोप करत गोंधळ घातला . तसेच अन्य कार्यकर्त्यांना देखील गोळा केले .
प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांच्या तोंडावरचा मास्क आधी कार्यकर्त्यांनी काढायला लावला . नंतर कार्यकर्त्यांनी कुलकर्णी यांना मारहाण केली . यावेळी अर्वाच्च शिवीगाळ , दमदाटी करत या कार्यकर्त्यांनी कार्यालयात गोंधळ घातला होता .
प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे , निवृत्त अधिकारी दादासाहेब खेत्रे यांनी आम्ही अजिबात दारू घेतली नसून वाटल्यास आमची वैद्यकीय चाचणी करा असे आव्हान मनसैनिकांना केले होते . तर श्रावण पाळत असल्याने पार्टी करण्यासारखा विषयच नसल्याचे अधिकारी म्हणाले.
दरम्यान या मारहाणीच्या क्लिप व्हायरल झाल्या होत्या . पोलिस घटनास्थळी आल्यावर सर्वाना पोलिस ठाण्यात घेऊन गेले . पालिका अधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी साठी मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले . तेथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचे अहवाल अजून समजू शकलेले नाहीत.
परंतु रविवारची पालिका कार्यलयातील घटना घडून देखील काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. पालिका अधिकारीच फिर्याद द्यायला आले नाही असे पोलिसांकडून सांगितले जात होते. रविवार असल्याने कुलकर्णी हे कामावर होते का ? या बाबत पोलिसांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन लेखी माहिती मागवली आहे असे सांगण्यात आले . पालिके कडून त्या बाबत पत्र येताच सरकारी कामात अडथळा केला म्हणून तशी कलमं लावणं योग्य ठरेल अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती.
अधिकाऱ्यास कार्यालयात जाऊन मारहाण केल्याची घटना असताना गुन्हा दाखल केला जात नसल्याने कामगार सेनेच्या वतीने आमदार प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली होती . शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी महिला शिवसैनिकांसह उपअधीक्षक डॉ . शशिकांत भोसले यांना लेखी पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तर पोलिसच गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असून रोज फिर्याद द्यायला अधिकारी जात असूनही बसून ठेवले जाते व फिर्याद घेतली जात नाही असे पालिका अधिकारी तसेच कर्मचारी संघटना सांगत होत्या . मारहाण , शिवीगाळचा व्हिडीओ असताना गुन्हा दाखल केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
अखेर पोलिसांनी घटना घडल्याच्या ६ दिवसांनी विकास फाळके , करण कांडनगिरे , सचिन पोफळे , सुनील कदम आदींसह अन्य कार्यकर्त्यांवर विविध कलमां खाली शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला आहे . आरोपीं मध्ये मनसेचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच शहरात चालणाऱ्या टायगर ग्रुपचे देखील पदाधिकारी - कार्यकर्ते आहेत. कुलकर्णी हे त्या दिवशी कर्तव्यावर होते असे महापालिके कडून पत्र आल्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिस सूत्रां कडून सांगण्यात आले.