- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले आणि शिरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गृहप्रकल्प साकारणाऱ्या टीएमसी म्हणजे तानाजी मालुसरे सिटी या कंपनीवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेलट्रेक्स हौसिंग कंपनी आणि गोपी रिसॉर्टतर्फे हा प्रकल्प उभारण्यात येणारा हा प्रकल्प आजतागायत तो पूर्ण झाला नाही. त्यामुळे यात गुतवणूक करणाऱ्या ४,१५७ ग्राहकांच्या फसवणूकप्रकरणी कंपनीच्या २१ संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. २००८ साली गोपी रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आकुर्ले येथील १०४ एकर जमिनीवर घरे बांधणार होती. तानाजी मालुसरे सिटी या नावाने गृहप्रकल्प सुरू केला होता. गोपी रिसॉर्ट कंपनीबरोबर भागीदारीत तानाजी मालुसरे सिटी उभी केली जात असताना भागीदारीत वाद निर्माण झाले होते. २००८ ते सन २०१९ यादरम्यान तेथे घर घेण्यासाठी ४२५७ लोकांनी नोंदणी करत जवळपास १३५ कोटींची गुंतवणूक केली होती, तर कंपनीने प्रकल्प उभा करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडले नसल्याने आता कंपनीवर १९१ कोटींचे कर्ज आहे. शिवाय २०१९ पर्यंत शेलट्रेक्स कंपनीने जमीन गहाण ठेवून त्यावर विविध खासगी वित्त संस्थांकडून १८० कोटींचे कर्ज घेतले आहे. असे एकूण ३५० कोटींचे कर्ज या जमिनीवर घेण्यात आले असून प्रकल्प मात्र आजतागायत उभा राहिलेला नाही. सन २०११ ते २०१३ या कालावधीत ४ मजली बांधकाम असलेल्या २२ इमारती उभ्या केल्या आहेत, परंतु त्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने तेथील ८०० फ्लॅटमध्ये केवळ १६७ लोक राहायला गेले होते.तानाजी मालुसरे सिटीमध्ये घर घेण्यासाठी पैसे भरलेल्या २४७ ग्राहकांनी अलिबाग येथील ग्राहक संरक्षण कक्षाकडे, तर काही ग्राहकांनी मुंबई हुतात्मा चौक येथील ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र २०१७ पर्यंत कंपनीने घरांसाठी पैसे भरणाऱ्या कोणत्याही ग्राहकांची रक्कम परत दिली नाही, उलट त्यांच्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मात्र बँकेकडून जात होते. कारवाई झालेले २१ संचालक...कर्जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी १० ऑगस्टला गोपी रिसॉर्ट प्रा. लि., तानाजी मालुसरे सिटी, शेलट्रेक्स प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात या कंपन्यांचे संचालक एबॉय मॉरिशस, गणेश राजेश कृष्णन, जोसीलव्हा, डी. के. मधुकर, उदयसिंग वाळुंज, हाफिज सौरभ काँट्रॅकटर, संदीप सिंग, सुरेश सिंग, अरुण अतलेकर, मुरारी दिनेश मुनीम, अनिल पांडुरंग कांबळे, जिनेंद्रक कण्हय्यालाल नाहर, सुनील विश्वनाथ, रवींद्र रमेश सिनकर, कीर्ती मलगौडा तिमन्नागौदर, अनिल पांडुरंग शिंदे, अनिल सुभाष सावंत, अमेय गणेश पाटील, मुकेश रुद्दल पटेल अशा एकूण २१ संचालकांचा समावेश आहे.माझ्या मित्राने स्वस्तात घर मिळते म्हणून घरे बुक केली होती, मात्र त्यांची सर्वांची फसवणूक झाली होती. आता गुन्हा दाखल केल्याने न्याय मिळू शकतो याची खात्री वाटत आहे.- उदय पाटील, कर्जत
कर्जतमधील टीएमसी कंपनीच्या 21 संचालकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 7:41 AM