- नितीन पंडितभिवंडी - भिवंडी शहरातील नारपोली अजमेर नगर परिसरात राहणारा प्रथमेश कमलेश यादव या अठरा महिन्याच्या चिमुरड्याचा २३ सप्टेंबर रोजी घरासमोरील झाकण नसल्याने उघड्या असलेल्या गटारीत पडून दुर्देवी मृत्यू झाला होता.या प्रकरणी नारपोली पोलिसांनी चौकशी अंती या दुर्दैवी मृत्युस भिवंडी महानगरपालिकेचे संबंधित ठेकेदार व त्यांच्या कामावर लक्ष ठेवणारे स्थानिक प्रभाग समितीचे कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बांधकाम ठेकेदार मुक्तदौर बुबेरे,सब कॉन्ट्रॅक्टर प्रविण सूर्यराव व प्रभाग समिती क्रमांक तीन चे कनिष्ठ अभियंता वसीम शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
अजमेर नगर येथील कमलेश कृष्णकुमार यादव यांचे घरासमोरील गटाराचे बांधकाम करणारे ठेकेदार अभियंता यांनी गटाराच्या नालीचे बांधकाम पूर्ण केले परंतु त्यावर आर.सी.सी. चेंबर लादी न बसवल्यामुळे काही लोक यापूर्वी त्यात पडुन किरकोळ जखमी झाले होते.बांधकाम ठेकेदार यांना नागरिकांनी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे याची जाणीव करून दिली होती.मात्र त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले होते.त्यामुळे ठेकेदार,उप ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांनी जाणीपूर्वक कामाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे निष्काळजीपणामुळे प्रथमेश यादव याचा अजमेरनगर येथील उघड्या गटारामधील पाण्यात पडुन मरण पावलेला आहे असा निष्कर्ष पोलीस तपासात काढल्या नंतर प्रथमेश याच्या मरणास या तिघांना जबाबदार धरीत त्यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेत पालिका ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे .