मीरारोड - मीरारोडच्या शीतलनगरमधील मुख्य रस्त्यावर नव्याने बांधलेल्या गटाराच्या चेम्बर वर झाकण नसल्याने त्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटने प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात ठेकेदार व पालिकेचे संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल नगरच्या एमटीएनएल मार्गावर सन्मान बार व हॉटेल असून त्या ठिकाणी नव्याने सिमेंट रस्ता आणि बंदिस्त गटाराचे काम केले गेले. पदपथ म्हणून याचा वापर होत असल्याने त्यावरून नियमित लोकं ये जा करत होते.या ठिकाणी असलेल्या गटाराचे काम अपूर्ण असल्यापासून चेम्बर वरील झाकण नसल्या बाबत स्थानिक नगरसेवक राजीव मेहरा, मर्लिन डिसासह याच भागात राहणाऱ्या नगरसेविका सीमा शाह यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या. तरी देखील दुर्लक्ष केले गेले असे नगरसेवक म्हणाले . दरम्यान गेल्या शुक्रवारी रात्री या भागात राहणारा सज्जाद बच्चू खान हा तरुण गटारात पडला. चेंबर वर झाकण नसल्याने गटारात पडल्याचे लोकांना लक्षात आल्याने त्यांनी पालिका अग्निशमन दलास कळवले. रात्री साडे दहाच्या सुमारास अग्निशमन दलाचे सब स्टेशन अधिकारी डॉसन ढोल्या सह अरुण शिर्के , गीतेश पाटील, चेतन झाडे , महादेव नाईक आदी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.ज्या चेम्बर मधून सज्जाद गटारात पडला होता तिकडून वाहून तो पुढे गेल्याने जवानांनी पुढल्या बाजूच्या चेंबरचे झाकण उघडून गटारात शोध सुरु केला. हुकला सज्जाद चा मृतदेह लागला असता तो बाहेर काढण्यात आला . ठेकेदार आणि महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे गटारात पडून बळी गेल्याचा संताप नागरिकांनी व नगरसेवकांनी बोलून दाखवला होता . या प्रकरणी महापालिका प्रशासन त्यांच्या स्तरावर चौकशी करत असली तरी मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी सज्जाद याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पालिकेचा ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ठेकेदाराचे नाव भावेश म्हणून नमूद आहे . पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत .
मीरारोड येथे पालिकेच्या उघड्या गटारात पडून तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पालिका अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 4:45 PM