नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून तिघांसह त्याच्या इतर साथीदारांनी मिळून व्यावसायिकाची १५१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने तपास करून शनिवारी शांतीनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दानसिंग शेरसिंग मावरी उर्फ धरमसिंग मावरी वय ४५ वर्ष रा.माजीवाडा ठाणे,अमितसिंग खाती वय ३२ रा. टेमघर भिवंडी व संजय पडेल रा.समता नगर,ठाणे यांनी व त्यांच्या साथीदारांनी आपापसात संगनमत करून २६ मार्च २००८ ते १७ जुलै २०२३ या दरम्यानच्या काळात पारस कुमार केशुलाल जैन वय ६० रा.वर्तकनगर,ठाणे यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन कट रचून स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी पारसकुमार यांची फसवणुक करून त्यांचे नावाने खोटया सहया,अंगठे करुन बनावट खरेदीखते करून हे खरेदीखत खरे असल्याचे भासवून त्यांच्यासह शासनाची व बँकेची १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची तसेच फिर्यादी यांनी पुरवलेल्या इलेक्ट्रीक साहित्याचे १ कोटी ६५ लाख रुपये न देता दिड कोटी रुपयांची फसवणुक केली आहे.
खोटया सहया व अंगठे मारून आरोपींनी भिवंडीतील अरिहंत सिटी फेज एक व दोन येथील सदनिका विक्री करून फसवणुक केलेली आहे.तर या मधील गुंतवणुकदार तसेच त्यांचे एजंट यांच्या मार्फत फिर्यादी यांना फोन करून जिवे ठार मारण्याच्या धमक्या देवुन त्यांच्या कडून अधिक पैशांची मागणी करीत जबरदस्तीने धनादेशावर सही करण्यास भाग पाडत होते.या बाबत पारसकुमार केशुलाल जैन यांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्याकडे तक्रार दिली होती.या चौकशी नंतर गुन्हे शाखेने शांतीनगर पोलिसांकडे पाठविलेल्या पत्रानुसार शांतीनगर पोलिसांनी दानसिंग उर्फ धरमसिंग मावरी,अमितसिंग खाती,संजय पडेल तसेच त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात फसवणुकी सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे हे करीत आहेत..