सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील कपडा व्यापारी मुकेश जग्याशी यांनी भिलवाडा गुजरात येथील व्यापाऱ्यांना देण्यासाठी दिलेली १८ लाखाची रक्कम नोकरांनी संगनमत करून लंपास करून पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर येथील प्रसिद्ध गजानन कपडा मार्केट मधील कापड व्यापारी मुकेश खुशीराम जग्याशी हे गुजरात भिलवाडा येथील कपडा आणत होते. कपड्याची देयके देण्यासाठी त्यांनी सुरेश देवासी यांना कामाला ठेवले होते. मात्र काही कारणास्तव देवासी याने काम सोडल्याने, त्याने ओळखी करून दिलेल्या कैलास, देवाराम व छगन यांना कामाला ठेवले. सहा महिने विश्वासाने काम करणाऱ्या नोकरा पैकी कैलास यांच्याकडे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८ लाख रुपये कृष्णा टेक्स्टाईल व मीना टेडर्स व्यापारी यांना देण्यास दिले. त्यापूर्वी देवाराम व छगन यांच्याकडे प्रत्येकी ५ लाख रुपये गुजरात येथील व्यापाऱ्यांना देण्यास दिले. मात्र एकून १८ लाखाची रक्कम गुजरात व्यापाऱ्यांना देण्यात आली नसल्याचे उघड झाले.
कपडा व्यापारी मुकेश जग्याशी यांनी गुजरात व्यापाऱ्यांना कपड्याची देयके व पैसे देण्यासाठी ठेवलेले नोकर कैलास, देवाराम व छगन यांच्याशी संपर्क केला असता, तिघांचे मोबाईल बंद होते. अधिक चौकशी केली असता, त्यांनी शहरातून पोबारा केल्याचे उघड झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी तिन्ही नोकरावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.