मीरारोड - कुत्र्याने एका ६ वर्षीय मुलास चावा घेतल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी भटक्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्या एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यात सोमवारी (२० जून) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, पश्चिमेच्या सुदामा नगर भागातील बद्रीनाथ इमारतीत राहणारे मुकेश परिहार हे कुटुंबासह रविवारी रात्री बाहेरून जेवण करून जिन्या वरून आपल्या फ्लॅटकडे जात होते. याच वेळी दुसऱ्या मजल्यावर मोकळ्या जागेत दोन कुत्रे झोपलेले होते.
याच वेळी अचानक जिन्यावर झोपलेल्या एका कुत्र्याने मागून येऊन सहा वर्षाचा कुश याला चावून भुंकू लागला. त्यावेळी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या व घरात कुत्रे पाळणाऱ्या तसेच भटक्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्या संध्या मेहता या बाहेर आल्या आणि व्हिडीओ काढू लागल्या. तसेच तुम्ही कुत्र्यास मारले तर, कामावर लावीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भाईंदर पोलिसांनी संघ्या मेहतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर श्वानमित्र संध्या मेहता म्हणाल्या, आपण भटक्या कुत्र्यांचे उपचार, आहार, लसीकरणाची काळजी घेतो. उलट सोसायटीच्या चौघांवर श्वानाचा छळ प्रकरणी फेब्रुवारीत गुन्हा दाखल आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी झोपलेला कुत्रा अचानक काहीही कारण नसताना चावण्याची प्रतिक्रिया देणार नाही. पूर्व वैमनस्यातून खोटा गुन्हा आपल्यावर दाखल केला असून चौकशीची मागणी केली आहे.