----------------------------------------------
दुचाकीला कारची धडक
कल्याण : शहरात बेदरकारपणो वाहने चालविली जात असल्याने सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सहजानंद चौकात कार आणि दुचाकीला अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली असताना गुरुवारी पश्चिमेकडील जळगाव जनता बँकेच्या बाजूला नर्सरीच्या समोरील रोडवर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सकाळी १०.३० वाजता घडली. यात दुचाकीचालक रवींद्र वाल्हे यांच्या खांदयाला दुखापत झाली असून, कारचालक पसार झाला आहे. याप्रकरणी वाल्हे यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
--------------------------------------------------
व्याजाने घेतलेल्या पैशावरून मारहाण
कल्याण: व्याजाने घेतलेले पैसे आताचे आता दे, असे बोलून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याच्या आरोपाखाली विकास आणि कल्पेश गिरी यांच्यासह मारहाण करण्यास सांगणा-या बाबा नायडूविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शशांक राणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. शशांक यांच्या वडिलांनाही दोघांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार पूर्वेकडील लोकधारा परिसरात सोमवारी दुपारी साडेतीन वाजता हिमगिरी अपार्टमेंटमध्ये घडला.
---------------------------------------------------
९० हजारांना लुबाडले
डोंबिवली : धक्का लागून मोबाईल खाली पडल्याने नुकसानभरपाई देण्याचा बहाणा करीत दोघा भामटयांनी दयाशंकर शारदाप्रसाद तिवारी यांच्याकडील ९० हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. हा प्रकार ठाकुर्ली ते आग्रा रोड दुर्गाडी किल्लादरम्यान गुरुवारी दुपारी १.३० ते २.३० दरम्यान घडला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------------
सोनसाखळी लंपास
डोंबिवली : उषा शिलवंत या त्यांच्या मुलीसह पूर्वेकडील पेंडसेनगर परिसरातून रात्री आठच्यादरम्यान जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटयांनी उषा यांच्या गळयातील मंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज खेचून लंपास केला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------------
चॉपरचा वार
कल्याण : गांजा पिण्यासाठी चल, असे बोलल्यानंतर नकार दिला म्हणून रागाच्याभरात रवी देवराज यांना अण्णा, साहील नाटे, किरण व अन्य एकाने बेदम मारहाण केली. यावेळी अण्णा याने रवीच्या हातावर चॉपरने वार केला. याप्रकरणी रवीने दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------