ठाणे: डोंबिवलीतील रिल स्टार, बिल्डर सुरेंद्र पाटील (५० , चोळेगाव, डोंबिवली) यांना बेकायदेशीरपणे दोन पिस्टल आणि सात जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती. याच प्रकरणात अटकेतील बिल्डरला ४० लाखांचा गंडा घालणाऱ्या स्वप्निल दशरथ जाधव (२६, रा. आनगाव , भिवंडी ) याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर त्यांच्याकडून १४ लाख ३५ हजारांची रोकड हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी मंगळवारी दिली. या चाैघांनाही २ डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
डोंबिवलीतील वादग्रस्त तथाकथित वादग्रस्त रिल स्टार बिल्डर सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने २५ नोव्हेंबर रोजी बेकायदेशीर पिस्तुल व सात जिवंत काडतुसासह डोंबिवलीतल्या मानपाडा भागातून एका मर्सडीज बेंज कारसह ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात आर्म्स एक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान, याच गुन्याच्या सखोल चौकशीमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक बागडे यांच्या पथकाला गंभीर प्रकार समोर आला. काही जण सुरेंद्र पाटील यांना बनावट नोटा तयार करून देणार होते. बनावट नोटा बनवून देणार्या एका टोळीने सुरेंद्र पाटील याच्याकडून एक कोटी ६० लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या बदल्यात चाळीस लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार सुरेंद्र पाटील हा आपल्या कार मधून चाळीस लाख रुपये घेऊन मुरबाड येथील एका फार्म हाऊसवर गेला होता.
यावेळी काही गडबड झाल्यास फायरिंग करण्यासाठी पाटील यांनी स्वत:कडे दोन विनापरवाना पिस्तूल ठेवले होते. त्यावेळी नोटा बनवून देणारे त्यांचे इतर पाच साथीदार तेथे आले. या टोळीने स्वत: पोलीस असल्याचे सांगून पोलिसांची रेड पडल्याचे भासवून पाटील यांच्याकडील ४० लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला होता. ठाणे खंडणी विरोधी पथकाने चाळीस लाखाची रक्कम लुटून नेणाऱ्या स्वप्निल जाधव याच्यासह आदेश मोतीराम भोईर (३५, रा. महापोली , भिवंडी ), सचीन बबन जाधव (३५, वाडा , पालघर) आणि अक्षय गायकवाड (३०, रा. अनगाव , भिवंडी) या चौष्घांना भिवंडी व वाडा परिसरातून अटक केली. या टोळीकडून १४ लाख ३५ हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सुरेंद्र पाटील याच्याविरुद्ध यापूवीर्ही सहा गुन्हे दाखल असल्याचे पाेलिसांनी सांगितले.