लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोड, भाईंदर पाडा, या ठिकाणी असलेल्या होरॉयझोन फ्लोरा सोसायटीच्या १६ व्या मजल्यावरील रूम नंबर १६०१ या घरात लागलेल्या आगीत रोख ५२ हजार रुपये जळून खाक झाले आहेत. सुदैवाने कपाटामध्ये असणारे सोन्याचे दागिने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ही आग सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लागली असून ती आग जवळपास एक तासांनी नियंत्रणात आली. घरात कोणी नसताना आग लागल्याने आगीचे कारण समजू शकले नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
होरॉयझोन फ्लोरा सोसायटी या तळ अधिक २० मजली असलेल्या ए विंग च्या रूम नंबर १६०१ या रूमला आग लागली होती. ते घर सीमा अमोणकर यांच्या मालकीचे असून तेथे जॉयनीता सालीयन्स या भाडोत्री आहेत. त्याच रूमच्या बेडरूमधील असणाऱ्या लाकडी शोकेस व देवघराला सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यावेळी घरात कोणी नव्हते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास तास लागला. या आगीत कपाटात असणारे कागदपत्रे, कपडे व रोख रक्कम ५२ हजार रुपये जळाले आहेत. तसेच त्या कपाटामध्ये असणारे सोन्याचे दागिने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून ते दहा. जॉयनीता सालीयन्स यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.