उल्हासनगर : शहरातील वायेगुरू मोटार येथून ईरटीका कारच्या खरेदीपोटी ८ लाख सलमान बेग याला दिल्यानंतर, त्याने कारसह घुम ठोकल्याची घटना शनिवारी घडली. कार मध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये १ लाख ७५ हजार रोख रक्कमेसह साहित्य व कागदपत्र आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारे रोशनसिंग सुरजितसिंग खेमाने यांनी शांतीनगर येथील वायेगुरु मोटार दुकानातून ईराटीका नावाची कार विकत घेण्यासाठी ४ नोव्हेंबर शनिवारी व्यवहार केला. कार व्यवहार करारनामा झाल्यानंतर ८ लाख रुपये ऑनलाईन सलमान ईरफान शेख यांच्या बँक खात्यात जमा केले.
त्यानंतर कार ताब्यात घेऊन कार मध्ये पैशाची पिशवी व कागदपत्रे ठेवली. त्यावेळी सलमान बेग याने गाडी वळवून घेतो. असे सांगून कारमध्ये बसून कारसह पळून गेला. सलमान बेग यांनी चोरून नेलेल्या कारमध्ये, ठेवलेल्या बॅग मध्ये १ लाख ६५ हजार रुपये, टिटीओ फॉर्म, सही केलेला करारनामापत्र, आरसी बुक आदी साहित्य होते.
या प्रकारानंतर रोशनसिंग खेमाने यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मध्यवर्ती पोलिसांनी सलमान ईरफान बेग याच्या विरोधात ९ लाख ७६ हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. सलमान बेग यांनी असे प्रकार इतरांसोबत केले का? यातूनही पोलीस तपास करीत आहेत.