अजित मांडके, ठाणे : एसटी महामंडळाने ज्या पध्दतीने प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेतून देखील नव्या वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी ठाणे परिवहन सेवेने अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागविले आहेत. ज्या संस्था विविध सोई सुविधा उपलब्ध करुन देतील, त्यांच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्याचा परिवहनचा प्रयत्न असणार आहे.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ३२५ च्या आसपास बस आहेत, त्यातील ३०० बस या रस्त्यावर धावत आहेत. या बसमधून रोज अडीच ते तीन लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. ठाणे परिवहनच्या ताफ्यात टप्याटप्याने इलेक्ट्रीक वातानुकुलीत बस देखील सहभागी होत आहेत. त्यातही परिवहनच्या बस ठाण्यातील अंतर्गत मार्गाशिवाय बोरीवली, मुंबई, भिवंडी मार्गावर देखील धावत आहेत. सध्या परिवहनकडे १ हजारांच्या आसपास ईटीव्हीएम मशिन आहेत. ज्यात तिकीट मिळते, परंतु त्यासाठी प्रवाशाला खिशात पैसे ठेवावेच लागतात. काही वेळेस सुट्टे पैसे नसल्यास वाहक आणि प्रवासी यांच्यात खटके देखील उडल्याचे चित्र दिसत आहे. परंतु आता टिएमटीमध्ये प्रवास करतांना सुटे पैसे नसणे, किंवा रोख स्वरुपात पैसे नसले तरी या नव्या डिजीटल मशिनच्या माध्यमातून आॅनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देण्यात देण्यात येणार आहेत.
त्यानुसार ठाणे परिवहन सेवेने या संदर्भात अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागविले आहेत. जी कंपनी आॅनलाईन पेमेंटच्या बाबतीत विविध सुविधा देतील, प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी काय काय योजना देणार त्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आता त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने नव्या वर्षात ही सुविधा ठाणेकर प्रवाशांसाठी सुरु करण्याचा मानस परिवहन सेवेचा आहे.
तसेच यापुढे जाऊन ई तिकीटीची सुविधा देखील देण्याचा प्रयत्न परिवहनच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच पास काढण्यासाठी प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना परिवहनच्या ठिकाणी तासनतास वाया घालवावा लागतो. मात्र भविष्यात ही सुविधा देखील आॅनलाईन पध्दतीने देण्याचा मानस परिवहनने व्यक्त केला आहे. त्यानुसार त्यासाठी देखील पावले उचलण्यात येत असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली.