ठाणे : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्येही जातगणना करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, ठाणे ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना पार पडली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुध्दा ओबीसी जनगणना केल्या असुन त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी प्रलंबीत आहे. देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे.
स्वातंत्रानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले आहे. यातून इतर मागासवर्गीय (ओबीसी) वंचित राहीले आहेत. 5 मे 2010 रोजी लोकसभेत ओबीसी जनगणनेचा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले होते. त्यातुन 2011 ते 2014 मध्य केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना ( 2011) केली. मात्र त्यांची आकडेवाडी राज्यांना दिली गेलेली नाही. देशात सन 2021 सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी; बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जातीनिहाय जनगणना करावी, या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या प्रसंगी दिगंबर लवटे, मंगेश वाघे, बाळा, कल्पेश भिमरा, तानाजी राऊत, दत्तात्रय जाधव, मनिषा पाटील, अश्विनी मोरे आदी उपस्थित होते.