ठाणे : ठाण्यातील डोळ्यांचे डॉ. चंद्रशेखर वावीकर यांच्या रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या डोळ्यावर बुधवारी यशस्वी शस्त्रक्रिया झाली. पहिल्या उजव्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी डाव्या डोळ्यावर आठ मिनिटांत शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर तासाभरात त्यांना घरी सोडण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी तीन दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने मुख्यमंत्र्यांनी शिर्डी येथील लाडकी बहीण योजनेचा प्रचार, प्रसार कार्यक्रम, राहुरीतील कांदा महाबँकेचे भूमिपूजन आदी नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
अशी झाली शस्त्रक्रिया
शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांना कोणतेही इंजेक्शन दिले नाही. यावेळी भूल देण्यासाठी डोळ्यात औषधाचे थेंब टाकण्यात आले. तसेच एकही टाका घालण्यात आला नाही. शिंदे यांना पेन किलरची गोळी दिली नसल्याची माहिती डॉ. वावीकर यांनी दिली.
२० जणांचे पथक
बुधवार, २५ सप्टेंबर रोजी डाव्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी अमेरिकन कंपनीच्या लेन्सचा वापर केल्याने शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर कमी होणार असल्याचे डॉ. वावीवर यांनी सांगितले. डॉ. वावीकर यांच्यासह डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २० जणांचे पथक ऑपरेशन कक्षात होते.