ठाणे : लम्पी रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता आवश्यक उपाययोजना जिल्ह्यात हाती घेण्यात आल्या आहेत. त्यासह ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या आदेशान्वये ठाणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशी यांचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांची शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यासाठी मनाई केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील तळवली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत वासरामध्ये लम्बी चर्मरोग सदृश लक्षणे आढळून आली आहेत. या वासरांना जन्म देणाऱ्या गाईमध्ये यापूर्वी लक्षणे आढळून आली होती व त्यांना सुद्धा लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यात लम्पी चर्मरोग सदृश लक्षणे दिसून येत आहेत.
प्राण्यांमध्ये संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम अन्वये अधिसूचित केलेल्या रोगामध्ये लम्पी चर्मरोगाचा अनुसूचित रोग म्हणून समावेश करण्यात आला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हा रोग सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ अंमलात आणणे आवश्यक आहे. यामुळेच ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने लम्पी चर्मरोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी ठाणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.