डोंबिवली : औद्योगिक विभागातील फेज १ पट्ट्यात आठ दिवसांपासून होत असलेल्या वायुप्रदूषणाला भंगारवाला कारणीभूत असल्याचे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन (कामा) या कारखानदारांच्या संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. विविध रंगांनी माखलेल्या गोण्या धुण्याचे काम भंगारवाला करत होता. त्यामुळे दर्पाचा त्रास झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कामा संघटनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी यांनी केलेल्या पाहणीदरम्यान हे उघडकीस आले. यासंदर्भात भंगारवाल्याला सक्त ताकीद देण्यात आल्याचे ‘कामा’ने पत्रकात नमूद केले आहे.औद्योगिक परिसरात अनेक रासायनिक कंपन्या असून काही दिवसांपासून खंबाळपाडा भागात या प्रदूषणाची तीव्रता जाणवत होती. साधारण एमआयडीसी निवासी भागापर्यंत पसरणारा हा दर्प ठाकुर्ली परिसरातील ९० फूट रोड परिसरापर्यंत पोहोचला होता. या दर्पामुळे खंबाळपाडा परिसरातील नागरिकांना मळमळणे आणि उलट्यांचा त्रासही झाला. या परिस्थितीकडे एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता बुधवारी विविध रहिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. शिष्टमंडळाने एमआयडीसी डोंबिवली विभागाच्या कार्यालयातही भेट देत वस्तुस्थिती सांगितली होती. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली क्षेत्र अधिकारी विशाल मुंडे यांना संबंधित शिष्टमंडळासह घटनास्थळी पाठवले. यावेळी केलेल्या पाहणीत ड्रेनेजवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्याने सांडपाणी नाल्यातून वाहताना दर्प येत असल्याचे आढळून आले. पाहणीदरम्यान नाल्यातून वाहणाºया सांडपाण्याचे नमुने अधिकाºयांकडून घेण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी कामा संघटना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पदाधिकाºयांनी एकत्रित केलेल्या दौºयानंतर प्रदूषण कारखान्यातील सांडपाण्याद्वारे होत नसून एका भंगारवाल्यामुळे प्रदूषित पाणी तयार होत असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे. रंगांनी माखलेल्या गोण्या धुण्याचे काम खंबाळपाडा, भोईरवाडी येथील नाल्यात भंगारवाला करतो. त्यामुळे त्या नाल्यातील पाण्याला विचित्र रंग येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पहाणीदरम्यान ‘कामा’चे अध्यक्ष देवेन सोनी, एमआयडीसीचे उपअभियंता दीपक पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शंकर भोसले, उपप्रादेशिक अधिकारी दीपक भोसले उपस्थित होते. शहराला प्रदूषणापासून दूर ठेवण्यास सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यक्षम असल्याचेही ‘कामा’ने म्हटले आहे.आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीकडे तक्रार केल्यानंतर प्रदूषणाचा त्रास थांबलेला आहे. कामा संघटनेने दिलेली माहिती हे प्रदूषण करणाºया कारखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. आमच्या दौºयाच्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी नाल्यातील पाण्याचे नमुने घेतलेले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यास सत्य उघड होईल.- काळू कोमास्कर, रहिवासी, खंबाळपाडा
‘त्या’ प्रदूषणाला भंगारवाला कारणीभूत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:19 PM