अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिकेमार्फत सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमांच्या नविन शाळा सुरु करणे नियोजित आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातही महापालिकेने कोट्यवधीची तरतुद केली आहे. ठाण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यासाठी महापलिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे हे पाऊल स्तुत्य असले तरी 'मराठी' शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये. अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. इंग्रजीचा सोस असला तरी, मराठी शाळांच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत. असेही त्यांनी म्हटले आहे.
ठाणे महापालिकेच्या ४ हजार ३७० कोटींच्या अर्थसंकल्पात शिक्षणाला झुकते माप दिले असुन महापलिकेमार्फत सीबीएसई शाळा सुरू करण्याचे तसेच, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या पालिकेच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत ठाण्यात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या ७ शाळा आहेत. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असला तरी सर्वसामान्य कुटुंबांना हे शिक्षण आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड असलेल्या सीबीएसई बोर्डामधून शिक्षण घेण्यासाठी ठाण्यात प्रामुख्याने केवळ खाजगी शाळांचे महागडे पर्याय उपलब्ध आहेत.तेव्हा, इंग्रजी माध्यमा बाबत महापालिकेचे हे पाऊल स्तुत्य असले तरी 'मराठी' भाषा आणि मराठी शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये.
इंग्रजी शाळा सुरु करत असताना मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. सध्या ठाण्यात मराठी शाळा बंद होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील महापालिकेच्या मराठी शाळांमधील विदयार्थ्यांची पटसंख्या वाढविणेसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. अशी सूचनाही त्यांनी केली.
ठाण्यात महापालिकेच्या शाळा आहेत. मात्र काही शाळेची अवस्था दयनीय झाली असून बदलते ठाणे अभियान अंतर्गत मराठी शाळांची डागडुजी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात यावी. विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे वर्ग बनवण्यात यावे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना योग्य सुविधासह शौचालयाकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी जाधव यांनी करत अर्थसंकल्पात केलेली घोषणा सत्यात उतरवण्यासाठी पालिका आयुक्तांनी प्रयत्न करावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच पाठिंबा राहील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.