- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 14 - शिवाईनगरमधील एका ७० वर्षीय वृद्धेची सोनसाखळी खेचणा-याचे चित्रीकरण थेट सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तरीही, तक्रारदार सुमित्रा भीमराव राणे या महिलेचा केवळ तक्रार अर्ज घेऊन वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी बोळवण केली आहे. चार दिवस वाट पाहू, मग याबाबतचा गुन्हा दाखल करू, असा अजब सल्लाच तक्रारकर्त्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.साधारणपणे सोनसाखळी खेचून पलायन केल्याप्रकरणाची यापूर्वी म्हणजे तीन ते चार वर्षांपूर्वी केवळ चोरीची तक्रार दाखल केली जात होती. न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी जबरी चोरीच्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला जातो. आरोपीला लवकर जामीन मिळू नये आणि त्याला कायद्याची जरब बसावी, हा त्यामागचा हेतू आहे. मध्यंतरी ठाण्यात तर सोनसाखळी चोरट्यांवर मोक्कान्वये पोलीस आयुक्त परमबीर सिंग, तत्कालीन पोलीस उपायुक्त पराग मणेरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घटही झाली. असे असताना शिवाईनगर भागातील ‘जिजामाता’ या इमारतीमध्ये राहणा-या सुमित्रा या १२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता फेरफटका मारून घरी परतल्या, तेव्हा एका २० ते २५ वयोगटांतील तरुणाने त्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी वळल्या असताना त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची (४५ हजार रुपये) सोनसाखळी हिसकावून पलायन केले. त्यांना काही समजण्याच्या आतच त्यांच्या इमारतीबाहेर दुचाकीवर असलेल्या दुस-या एका भामट्याबरोबर सोनसाखळी खेचणाराही पळून गेला. प्रचंड घाबरल्यामुळे सुमित्रा यांनी दुस-या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी सकाळी दीपक या आपल्या वकील मुलासमवेत जाऊन वर्तकनगर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनसाखळी हिसकावणारा स्पष्ट दिसतो, ते फुटेजही अॅड. राणे यांनी पोलिसांना दाखवले. तरीही, त्यांना तीनचार दिवस थांबा, नंतर गुन्हा दाखल करू, असा अजब सल्ला देण्यात आला. त्याऐवजी त्यांच्याकडून केवळ तक्रार अर्ज घेण्यात आला. एखाद्या वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान, शिवाईनगरातील याच इमारतीमधील कदम या अन्य एका व्यक्तीचीही सोनसाखळी हिसकावल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी घडला होता. सोनसाखळी जबरी चोरीच्या या वाढत्या घटनांची पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणी येथील रहिवासी जितेंद्र शिंदे यांनी केली आहे.
‘‘या महिलेने गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रह धरणे अपेक्षित होते. परंतु, यात नेमकी चूक कोणाची आहे, ते पडताळले जाईल. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल.महादेव भोर, सहायक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, ठाणे