कल्याण : आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी कल्याण-डोंबिवली सज्ज झाले आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे कायम असले, तरी केडीएमसीने विसर्जनस्थळी जय्यत तयारी केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीसी कॅमेरे, विद्युत व जनरेटरची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच १६ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने खड्डे बुजवण्याची कामे सुरू आहेत, असा दावा केडीएमसीने केला आहे.दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वी खड्डे बुजवण्याची कामे मार्गी लावली जातील, असा दावा अधिकाºयांनी केला होता. परंतु, पावसाच्या अतिवृष्टीमुळे तो आजही पुरता फोल ठरला आहे. अनंत चतुर्दशीला होणाºया विसर्जनासाठी महापालिकेने जोमाने तयारी केली आहे. विसर्जनस्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच पर्यावरण संतुलनासाठी १६ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्यातील चार कृत्रिम तलाव कल्याणमध्ये, तर उर्वरित डोंबिवलीत आहेत. भक्तांनी निर्माल्य तलाव व खाडीत न टाकता स्वयंसेवकांकडे द्यावे. निर्माल्याचे संकलन नानासाहेब धर्माधिकारी संस्था व अन्य सामाजिक संस्था तसेच विद्यार्थी करणार आहेत, अशी माहिती केडीएमसीने दिली.
सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर, केडीएमसीची जय्यत तयारी : विद्यार्थी करणार निर्माल्याचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:35 AM