ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध शुक्रवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रामध्ये मुख्यत्वे प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीचा समावेश आहे.मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी महिन्यात केला होता. याप्रकरणी देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचे वकील रिझवान सिद्दिकी, एक पोलीस शिपाई आणि काही खासगी गुप्तहेरांसह १२ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.आरोपी प्रशांत पालेकर आणि अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्याकडून नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर पोलिसांनी हस्तगत केला होता. त्याच्याशी संबंधित तपासाचा मुद्दा आरोपपत्रामध्ये नमूद केला आहे.संतोष पंडागळे, जसप्रीतसिंग मारवाह, कीर्तेश कवी, अॅड. रिझवान सिद्दिकी आणि पोलीस शिपाई नितीन खवडे या पाच आरोपींचा पहिल्या आरोपपत्रात समावेश नाही. त्यापैकी जसप्रीतसिंग मारवाह याने त्याच्या मोबाइल फोनचे लॉकिंग पॅटर्न पोलिसांना अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे त्याच्या मोबाइल फोनची न्यायवैद्यक तपासणी पोलीस करत आहेत. या आणि तपासाशी संबंधित इतर कारणांमुळे पाच आरोपींना पहिल्या आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. रजनी पंडित, माकेश पांडियन, प्रशांत श्रीपाद पालेकर, जिगर विनोद मकवाना, समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल, प्रशांत अनंत सोनवणे आणि अजिंक्य काशिनाथ नागरगोजे या सात आरोपींची गुन्ह्यातील भूमिका आणि त्यांचा सहभाग आरोपपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी जवळपास २८४ सीडीआर मिळवल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यापैकी १११ सीडीआर एकट्या अजिंक्य नागरगोजेने मिळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.सर्वोच्च न्यायालयात आव्हानअॅड. रिझवान सिद्दिकी यांची अटक उच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर पोलिसांनी बुधवारी त्यांना कोठडीतून सोडले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याचे आदेशही दिले. या आदेशावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस शनिवारी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. वेळप्रसंगी पोलिसांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सीडीआर प्रकरण : रजनी पंडितसह सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:47 AM