उल्हासनगर : शहराचा ७१ वा स्थापना दिवसनिमित्त तरण तलाव येथील ऐतिहासिक शिलालेखाला पुष्पहार अर्पण करून आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, विविध पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.
देशाच्या फाळणी वेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याण शहारा जवळील ब्रिटिश कालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. ८ आॅगस्ट १९४९ साली देशाचे पहिले गव्हर्नर सी. गोपालचारी यांनी विस्थापित वस्तीच्या बाजूने वाहणाऱ्या उल्हास नदी वरून विस्थापित वस्तीला उल्हासनगर नाव देण्यात आले.
शहर नामकरणाच्या ऐतिहासिक शिलालेख महापालिका मुख्यालयात मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आला असून शहराच्या वर्धापन दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने नामांतर शिलालेखाला पुष्पहार अर्पण करून विविध पक्षाच्या नेत्यांनी केक कापून शहराचा वर्धापन दिवस साजरा केला.
सिंधी समाजाने शून्यातून विश्व निर्माण केले असून सर्वच क्षेत्रात सिंधी बांधवांनी स्व: कर्तुत्वावर शहराचे नाव राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध केले. देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात कोणीही उपासी झोपत नाही. अशी ख्याती आहे. व्यापाऱ्यांचे हब असलेल्या शहरात कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र शहराचा विस्तार, शासन सवलती, महापालिका आयुक्त, रिक्त जागा न भरणे आदी कामे झाल्यास शहराला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे.
आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते तरण तलाव येथील शहराच्या शिलालेखातचे पूजन करून केक कापण्यात आला. यावेळी उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वाढारिया, विविध पक्षाचे नगरसेवक, मनसेचे व वालधूनी बिरदरीचे पदाधिकारी उपस्थित होते.